पुणे: केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीई नियमन 2025 ला मान्यता दिली आहे. एनसीटीई नियमन 2025 चा मसुदा राज्ये आणि विद्यापीठांना पाठविला आहे. या नियमांतर्गत जवळजवळ 11 वर्षांनंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. यामध्ये पीजीनंतर एक वर्ष बीएड, पदवीनंतर दोन वर्षे बीएड, बारावीनंतर चार वर्षे बीएड आणि एमएड पदवी अभ्यासांनाही मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दहा वर्षांनंतर पुढील वर्षापासून पुन्हा एक वर्षाचा बीएड पदवी कार्यक्रम सुरू होत आहे.
‘एनसीटीई’ने शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा एनईपी 2020 आणि 2047 विकसित भारत ध्येयअंतर्गत हे एनसीटीई नियमन-2025 तयार केले आहे. एनईपी 2020 अंतर्गत शालेय शिक्षण पायाभूत टप्पे, पूर्वतयारी टप्पे, मध्यम आणि माध्यमिक टप्पे, अशा चार भागांमध्ये विभागले गेले आहे. शिक्षकांना या चार वेगवेगळ्या स्तरांवर तयार केले जाईल. याशिवाय पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांच्या रचनेत बदल झाल्यामुळे शिक्षक होण्यासाठी स्वतंत्र बीएड कार्यक्रम सुरू केले जात आहेत.
याशिवाय एनईपीअंतर्गत सर्व कार्यक्रम, क्रेडिट फ्रेमवर्क आणि अभ्यासक्रम तयार केले आहेत; ज्यामध्ये एआय, व्यावसायिक अभ्यासक्रमांसह उदयोन्मुख क्षेत्रे जोडली आहेत. तसेच एमएड पूर्णवेळ आणि एमएड अर्धवेळ अभ्यासक्रमात देखील बदल केला आहे.
एनईपी-2020 लागू होण्यापूर्वी 750 महाविद्यालयांमध्ये दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम सुरू होता. नवीन नियम लागू झाल्यानंतर हा दोन वर्षांचा बीएड कार्यक्रम विस्तारित केला जाईल. या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय कार्यक्रम सुरू करणे बंधनकारक आहे. नियमांची पूर्तता न करणार्या महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम बंद केला जाईल. यासाठी चार वर्षांचा कालावधी दिला आहे.
बीएडमध्ये आगामी सत्रापासून चार नवीन स्पेशलायझेशन
चार वर्षांचा पदवीधर पदवी कार्यक्रम आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी एक वर्षाच्या बीएड कार्यक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतील. नियमांनुसार हा पदवी कार्यक्रम 2014 मध्ये बंद करण्यात आला. परंतु, आता एनईपी 2020 च्या शिफारशींनुसार, 10 वर्षांनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्राम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी मिळेल. चार वर्षांचा एकात्मिक बीएड या पदवी कार्यक्रमाचा विस्तार केला आहे. बीए-बीएड, बीएस्सी-बीएड आणि बीकॉम-बीएडची पहिली बॅच 2023 मध्ये सुरू झाली.
यामध्ये आगामी सत्रापासून म्हणजेच 2025 पासून शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, योग शिक्षण आणि संस्कृत शिक्षण हे चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रम जोडले जाणार आहेत. शिक्षक होण्यासाठी हा एक प्रीमियम कार्यक्रम असेल. बारावीनंतर शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी या चार वर्षांच्या बीएड एकात्मिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.