पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणानिमित्त गावी गेलेले शहरातील नागरिक आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले असून, खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून विदर्भ व मराठवाड्यासह इतर भागातील प्रवाशांची लूट सुरू झाली आहे.
दिवाळी सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच रेल्वेच्या ज्यादा गाड्यांचे नियोजन केले जाते. मात्र, शिक्षण आणि रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने रेल्वे आणि एसटीचे आरक्षण फुल्ल होऊन गेल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. दिवाळी संपल्याने आता याच नागरिकांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, या नागरिकांकडून आता तीन ते चारपट अधिक भाडे घेऊन खासगी वाहनधारक प्रवाशांची लूट करीत आहेत. मात्र, आरटीओ याबाबत मौन बाळगून असून कारवाईच्या नावाला खो दिला
जात आहे.