पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छतेमध्ये फाइव्ह स्टार (पाच स्टार) रेटिंग मिळविल्यानंतर पुणे महापालिका आता सेव्हन स्टार (सात स्टार) रेटिंग मिळविण्याच्या तयारीला लागली आहे. हे रेटिंग मिळविण्यासाठी महापालिकेला शहरातील सांडपाणी आणि बांधकामाच्या राडारोड्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. यासाठी महापालिकेने केंद्र सरकारकडे 95 कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
नुकतेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये पुणे शहराने सहभाग घेतला.
गेल्या वर्षी या स्पर्धेत पुणे देशात 20 व्या स्थानावर होते. यंदा मात्र शहराने चांगली झेप घेत 10 वे स्थान मिळविले आहे. तसेच आजपर्यंत 3 स्टारमध्ये असलेल्या पुण्याला महापालिकेने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पहिल्यांदाच या वर्षी फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. महापालिका आणि पुणे शहरासाठी ही मोठी संधी मानली जाते. महापालिका पुढील काळात सेव्हन स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
जायका प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाल्यावर महापालिका यासाठी पात्र होऊ शकते. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, "स्पर्धेचे निकष हे दरवर्षी बदलत असतात. आता सांडपाणी, ड्रेनेजव्यवस्था याला पन्नास टक्के गुण आहेत. त्याचे वेगवेगळे निकष आहेत. सध्या पुणे शहराला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले असून, आता पुढील लक्ष्य 'सेव्हन स्टार' रेटिंग मिळविण्याचे आहे. हे रेटिंग मिळविल्यानंतर आपले शहर पहिल्या पाच शहरांत स्थान मिळवू शकते. तसेच वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापैकी किमान 30 टक्के तरी पाण्याचा पुनर्वापर करावा लागणार आहे.
शहरातील वाढत्या पुनर्विकासाचे प्रमाण लक्षात घेता, बांधकामाच्या राडारोड्याची विल्हेवाट हा देखील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. यासाठी सध्या वाघोली येथे प्रकल्प कार्यान्वित आहे. गुजर – निंबाळकरवाडी येथे नवीन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यासंदर्भातील कामे करण्यासाठी केंद्र सरकारकडे 95 कोटींच्या निधीची मागणी केल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.
शहरात कचरा साठून राहणार्या 'क्रोनिंग स्पॉट'ची संख्या कमी करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच संबंधित विभागाला कचरा वाहतुकीसाठी गाड्याही दिल्या जाणार आहेत. तसेच गस्त घालणे आणि जनजागृती करण्यासाठी चारचाकी वाहने, कर्मचार्यांसाठी वॉकी टॉकी घेतली जाणार आहे.
डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
हेही वाचा