पुणे

पुणे : आता पोलिसांची ‘माय सेफ’नाकाबंदी!

अमृता चौगुले

अशोक मोराळे

पुणे : शहरातील नाकाबंदी आणि फूट पेट्रोलिंगची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आता मायसेफ अ‍ॅपद्वारे नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाला एकाचवेळी कोणत्या ठिकाणी नाकाबंदीची अंमलबजावणी सुरू आहे, ते शहराच्या नकाशावर लाइव्ह दिसणार आहे. नाकाबंदीच्या ठिकाणांवर सह पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त आणि पर्यवेक्षक पोलिस अधिकार्‍यांचे (उपायुक्तांचे) लक्ष राहणार असून, आवश्यक त्या सूचनादेखील करता येणार आहेत.

प्रत्येक दिवशी पोलिस आयुक्त अचानक कोणत्या प्रकारची नाकाबंदी करायची, हे सांगतात. त्यानुसार ठाण्यांचे प्रभारी अधिकारी त्याची अंमलबजावणी करतात. शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस दल किती तत्पर आहे, याची पडताळणी केली जाते. रात्री दोन वाजेपर्यंत नाकाबंदीवर लक्ष ठेवले जाते. आयुक्तांनी नाकाबंदीचे कामकाज व्यवस्थित होत नसल्याबाबत सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने एक मार्गदर्शिका तयार केली. त्यानुसार शहरात त्रिस्तरीय (तीन प्रकारे) नाकाबंदीला सुरुवात झाली.

नाकाबंदीचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार करण्यात आले आहेत. शहरातील बाहेर पडण्याचे रस्ते बंद करायचे झाले, तर कोणती नाकाबंदी लावायची तसेच कोणती कारवाई करण्यासाठी कोणत्या नाकाबंदीची गरज आहे, हे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी किती व कसे पॉइंट असावेत, हे देखील ठरविण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी शस्त्रसज्ज पोलिस तैनात केले. त्यानंतर आता माय सेफ अ‍ॅपद्वारे नाकाबंदीची दखल घेण्यास सुरुवात केली आहे.

फूट पेट्रोलिंगमुळे स्ट्रीट क्राइमला चाप

नाकाबंदी आणि फूट पेट्रोलिंगमुळे पोलिसांचा वावर रस्त्यावर वाढला. पोलिसांची उभे राहण्याची पद्धत ते गाड्यांचे दिवे सुरू ठेवण्यापासून प्रत्येक बाबींवर पर्यवेक्षक अधिकार्‍यांचे लक्ष असते. शस्त्रसज्ज पोलिस तैनात असतात. त्यामुळे स्ट्रीट क्राइममध्ये मोठी घट झाली.

नेमकी काय आहे माय सेफ प्रणाली..?

पोलिस ठाण्यातील बिट मार्शल हद्दीमध्ये गस्त घालत असताना किंवा एखाद्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढून तो माय सेफ पुणे प्रणालीवर अपलोड करतात. फोटो अपलोड होताच घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश व रेखांश आणि वेळेची नोंद होते. प्रणालीवरून पोलिस नियंत्रण कक्षाला पोलिस कुठे गस्तीवर आहे? याची लाइव्ह माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी भेट दिली, याची सर्व माहिती प्रणालीत नोंद होते. त्यानुसार पोलिसांची गस्त व अन्य बाबींचा आढावा घेणे वरिष्ठ अधिकार्‍यांना शक्य होते.

अरे व्वा! सुरक्षित पुण्यासाठी हे चांगलंय

नागरिक थांबून पोलिसांना विचारतात… आज काय शहरात घडले आहे का? अचानक नाकाबंदी लावली आहे. पोलिसांकडून हे दैनंदिन काम असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी नागरिक म्हणतात..अरे व्वा, हे सुरक्षित पुण्यासाठी चांगले आहे. पोलिसांच्या नाकाबंदीमुळे इतर भीती वाटत नाही. पोलिस रस्त्यावर असतात, त्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. रात्री उशिरा येणार्‍या प्रवाशांना मदत होते आहे. नाकाबंदीच्या वेळी महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

शहरात नाकाबंदी आणि फूट पेट्रोलिंगची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आता माय सेफ अ‍ॅपद्वारे नाकाबंदीवर नियंत्रण ठेवले जाते आहे. पर्यवेक्षक अधिकार्‍यांना नाकाबंदी नकाशावर लाइव्ह दिसते. गरजेनुसार आवश्यक सूचना देता येतात.

– रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

SCROLL FOR NEXT