पुणे

आता सी-व्हिजिल’वर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदवता येणार

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या 'सी-व्हिजिल' अ‍ॅपवर मतदारसंघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

जिल्ह्यात चिंचवड व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे, आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन 'सी-व्हिजिल' अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येते.

अ‍ॅप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात. तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या 52 तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ऑपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी  दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT