पुणे

आता हडपसर टर्मिनलवरून थेट गुवाहाटीसाठी रेल्वे..

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाकडून हडपसर टर्मिनलवरून नवीन गाडी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही नवीन रेल्वे हडपसर येथून आसाम राज्यातील गुवाहाटीसाठी सुटेल. मात्र, ही गाडी साप्ताहिक असणार आहे.पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला येथून 200 ते 230 पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यातही आता प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वे प्रशासनाला अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्या लागत आहेत. याही विशेष गाड्यांचा भार पुणे रेल्वे स्थानकावर पडत आहे.

पुणे रेल्वे स्थानकाचा भार कमी व्हावा, याकरिता रेल्वे प्रशासनाकडून हडपसर येथे टर्मिनलचा विकास केला जात आहे. परंतु, येथून प्रवाशांसाठी आवश्यक असलेली फीडरची सेवा म्हणावी तशी उपलब्ध नाही. टर्मिनलला जोडणारे रस्ते छोटे असल्याने पीएमपीचे फीडर पुरविणे कठीण जात आहे. त्यासोबतच येथे टॅक्सीसेवा उपलब्ध होत नाही. रिक्षाचालक अवाच्या सव्वा पैसे मागून प्रवाशांची लूट करीत आहेत. यामुळे रेल्वेने येथे सर्वप्रथम फीडरसेवा उपलब्ध करावी आणि मगच नव्या गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी येथील प्रवाशांकडून केली जात आहे.

हडपसर-गुवाहाटीच्या 16 फेर्‍या

हडपसर-गुवाहाटी साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक 05609) दि. 9 मे ते 27 जून 2024 दरम्यान हडपसर येथून दर गुरुवारी सकाळी 10 वाजता गुवाहाटीसाठी सुटणार आहे. या गाडीच्या या कालावधीत आठ फेर्‍या होतील तसेच गुवाहाटी-हडपसर साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक 0561) दि. 6 मे ते 24 जून 2024 दरम्यान दर सोमवारी गुवाहाटी येथून रात्री 8.40 वाजता हडपसरसाठी सुटेल.

आता फीडर बसची व्यवस्था करा

सध्या हडपसर येथून नांदेडसाठी रेल्वेगाडी धावत आहे. आता लवकरच गुवाहाटीसाठी गाडी सुटणार आहे. त्यामुळे रेल्वे, पीएमपी प्रशासनाने येथे फीडरसेवेसाठी बसची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पीएमपी, रेल्वे प्रशासनामध्ये तू तू-मैं मैं

रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनल येथून पीएमपीची बससेवा सुरू व्हावी, अशी पत्राद्वारे अनेकदा पीएमपी प्रशासनाला मागणी केली. आता फक्त दोन मिडी बसद्वारे सेवा सुरू आहे.

यात्रांनिमित्त एसटीकडून जादा गाड्या

एसटीच्या पुणे विभागाकडून चैत्र पौर्णिमेनिमित्त जेजुरी, नारायणपूर, निमगाव दावडी येथे भरणार्‍या यात्रेसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच श्रीशंभू महादेव, शिंगणापूर यात्रेसाठीसुध्दा एसटीच्या पुणे विभागाकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT