पुणे

आता कमी कागदपत्रांमध्येच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र..

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समता पंधरवड्यांतर्गत बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र जलद आणि कमी कागदपत्रांमध्येच दिले जाणार आहे.
विविध अभ्यासक्रमासाठी जसे की एमएचटी- सीईटी, नीट, जेईई, एमबीए, पी.एचडी., बीएस्सी अ‍ॅग्री, बी- फार्म, बीएस्सी नर्सिंगसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सांविधानिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टीच्या https:///bartievalidity. maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्जासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथपत्र अशा पुराव्याच्या साक्षांकित प्रती जोडून जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज वेळेत सादर करावा.

अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे. जातवैधता प्रमाणपत्रासाठी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या व त्रुटीअभावी अर्ज प्रलंबित असलेल्यांना समितीने मोबाइल, ई- मेलद्वारे संदेश पाठवले आहेत. संबंधित अर्जदारांनी देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांसह त्रुटी, पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा जात पडताळणी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT