पुणे

आता ‘दत्तवाडी’ नव्हे ‘पर्वती’ पोलिस ठाणे म्हणा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अखेर नामकरण झाले आहे. आता यापुढे याचे नाव 'पर्वती पोलिस ठाणे' असे असणार आहे. शासनाने याबाबत आदेश नुकतेच पारित केले असून, लक्ष्मीनगर रहिवासी संघाने नामकरणासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. पर्वती टेकडीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. 2008 मध्ये स्वारगेट पोलिस ठाण्याची व्याप्ती आणि वाढते गुन्हे लक्षात घेऊन स्वारगेट पोलिस ठाण्याचे विभाजन करून दत्तवाडी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती.

दत्तवाडी पोलिस ठाणे झाल्यानंतर मात्र, दत्तवाडी पोलिस चौकी व दत्तवाडी पोलिस ठाणे या नामसार्धम्यामुळे नागरिकांमध्ये संभ—म निर्माण होत असे. त्यांचा या नावाला विरोध होता. लक्ष्मीनगर रहिवासी संघाने पोलिस ठाणे, पोलिस आयुक्तालय व प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले. पर्वती परिसरात हे ठाणे असताना त्याचे नाव दत्तवाडी ठेवण्यात आले होते. त्यासोबतच दत्तवाडी म्हटले की, अनेकजण दत्तवाडी पोलिस चौकीला जात असत. तसेच, घटना पर्वती, लक्ष्मीनगर, जनता वसाहत वा इतर ठिकाणी घडली तरीही दत्तवाडीत घडली असे होत असे, त्यामुळे दत्तवाडीचे रहिवासीदेखील यामुळे नाराज होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून याबाबतचा पत्रव्यवहार प्रशासन व गृहविभागाकडे केला जात होता. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलिस ठाणे करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाने दत्तवाडीचे 'पर्वती पोलिस ठाणे' असे नामकरण केले आहे.

SCROLL FOR NEXT