पुणे

पुणे : आरटीओ नव्हे, अंधार कोठडी!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सोमवारी अर्ध्यापेक्षा जास्त आरटीओ कार्यालयाचे अंधार कोठडीत रूपांतर झाले. त्यामुळे सोमवारी कागदपत्रांच्या कामासाठी आलेले नागरिक ताटकळत बसले. अनेक नागरिकांना वैतागून घरी निघून जावे लागले.

पुणे येथील आरटीओ कार्यालय राज्यातील सर्वात महत्त्वाच्या कार्यालयांपैकी एक आहे. येथे राज्यातील बहुतांश भागातून दररोज हजारो नागरिक कामानिमित्त येतात. तसेच, पुणे विभागाचे मुख्यालय असल्याने जिल्ह्यासह विभागातून नागरिक या ठिकाणी येतात. सोमवारी मात्र, कामासाठी आलेल्या नागरिकांची निराशा झाली.

कारण, आरटीओ कार्यालय सकाळी 10 पासून अंधारात गेले ते सायंकाळी साडेपाच वाजता उजळले. तोवर कार्यालयाची वेळ देखील संपत आली होती. महावितरणच्या वतीने दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू होते. एक फेज उडाल्याने अर्धे कार्यालय काळोखात गेल्याचे आरटीओ अधिकार्‍यांनी सांगितले.

इंटरनेट, संकेतस्थळाचा सर्व्हरही कायम डाऊन
सोमवारी लाईट गेल्यामुळे नागरिकांना त्रास झाला. मात्र, नेहमीच नागरिकांना इंटरनेटची समस्या आणि एनआयसीच्या संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे कामाचा खोळंबा होतो. आरटीओतील कामकाज बहुतांशपणे ऑनलाइन चालते. त्यामुळे नागरिकांना सर्वाधिक इंटरनेट आणि संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यावर आरटीओ प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी होत आहे.

अधिकार्‍यांची कसरत
एकीकडे वीज जाणे, सर्व्हर डाऊन होणे, इंटरनेट नसणे यामुळे कामे वेळेत होत नसल्याने नागरिक तर कामाच्या वाढत्या ओझ्याने कर्मचारी हैराण झाले आहेत. परिणामी, अधिकारी, कर्मचार्‍यांना रोजच्या अपॉइंटमेंट असलेल्या नागरिकांसह मागच्या रद्द झालेल्या शिल्लक अपॉइंटमेंटचीही कामे कर्मचार्‍यांना करावी लागत आहेत. तसेच, रोजचे अतिरिक्त नियोजन करताना अधिकार्‍यांना कसरत करावी लागत आहे.

सोमवारी कार्यालयातील एक फेज गेल्यामुळे अर्धे कार्यालय अंधारात गेले. ते दुरुस्तीचे काम सुरू होते. पुरवठा खंडित झाला तरी आम्ही नागरिकांची कामे तातडीने करण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांची कामे वेळेवर होण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील असतो.

                                 – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

सोमवारी दिवसभर आरटीओ कार्यालयातील लाईट गेली होती. त्यापेक्षा अधिक बीएसएनएलचे इंटरनेट बंद होणे, एनआयसीचा सर्व्हर डाऊन होणे, या सेवांच्या चुकांमुळेच सर्वाधिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
                                      – एकनाथ ढोले, अध्यक्ष, सत्यसेवा वाहतूक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT