सहा वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली File Photo
पुणे

गर्भवती मृत्यू प्रकरण : फक्त दीनानाथच नाही तर सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ या हॉस्पिटलमध्येही त्रुटी

या रुग्णालयांनी महिलेच्या उपचारांबाबत राबवलेल्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते

पुढारी वृत्तसेवा

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाबाबत दररोज नवे मुद्दे समोर येत आहेत. ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने दीनानाथ रुग्णालय किंवा डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवला नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ससूनच्या समितीने दीनानाथ रुग्णालयासह सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा आयव्हीएफ या रुग्णालयांनी महिलेच्या उपचारांबाबत राबवलेल्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय निष्काळजीपणाचा निर्णय घेण्यासाठी ससूनमधील सहा वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला दाखल करून घ्यायला हवे होते. तिला उपचारांसाठी साडेपाच तास वाट पाहावी लागली, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीनेही याच मुद्द्याचा अहवालात उल्लेख केला होता.

मुद्द्यांबद्दल गोपनीयता

ससूनच्या समितीचा अहवाल या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा आणि फौजदारी कारवाई यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे या अहवालातील मुद्द्यांबाबत प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे. महिलेची गर्भधारणा अतिजोखमीची आहे हे माहीत असूनही इंदिरा आयव्हीएफने उपचार करून गर्भधारणा पुढे नेण्याचा सल्ला दिला. सूर्या हॉस्पिटलने असे गंभीर प्रकरण हाताळण्यासाठी पुरेशा सुविधांशिवाय रुग्णाला दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि महिलेच्या मृत्यूनंतर मणिपाल हॉस्पिटलने शवविच्छेदनाचा निर्णय का घेतला नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अहवालात ठोस भाष्य नाही

अहवालात चारही रुग्णालयांच्या त्रुटी दाखवल्या असल्या, तरी कोणत्याही रुग्णालयाकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही, याबाबत ठोस भाष्य करण्यात आलेले नाही. गुरुवारी रात्री पोलिस आयुक्तांनी अहवाल तपासल्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांना विशिष्ट प्रश्न पाठवले आणि या प्रकरणात काही वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे की नाही, याबद्दल उत्तर देण्यास सांगितले. याबाबत काय निर्णय होणार, यावर कारवाईची पुढची दिशा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT