मंचर : पुढारी वृत्तसेवा : आमचा कुठल्याही मजहब किंवा धर्माला विरोध नसून, या राज्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवून औरंगजेबवृत्तीस प्रोत्साहन देणार्यांना विरोध असल्याचे प्रतिपादन श्री शिवशंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे यांनी केले. शनिवार (दि. 24) आंबेगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चाचे मंचर (ता. आंबेगाव) येथे आयोजन केले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते. शत्रूंच्या स्त्रियांचा सन्मान करून त्यांना सुखरूप घरी पाठविणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म आणि आपल्या सख्ख्या भावाची हत्या करून त्याच्याच बायकोशी निकाह करणार्या औरंगजेबाचा मजहब सारखा होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे स्टेटस ठेवणार्यांना कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने ठोका.
राज्यात कायदा व सुव्यवस्था पाळणारे हिंदुनिष्ठ, राष्ट्रभक्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात व औरंगजेबाचे स्टेटस ठेवणार्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. याबाबत सरकारने कठोर कायदा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून
छत्रपती संभाजी महाराज चौक, पिंपळगाव फाटा, लक्ष्मी रस्ता अशी होऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नीलेश भिसे यांचे भाषण झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, बजरंग दलाचे संतोष खामकर, गणेश खानदेशी, जिल्हा उपप्रमुख विजय पवार, तालुका संघटक संदीप बाणखेले आदींसह आंबेगाव तालुका हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संदीप बाणखेले, अॅड. स्वप्ना पिंगळे आदींनी प्रयत्न केले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.