पुणे

Pune Crime news : जुगार अड्डा नव्हे व्हिडीओ गेम पार्लर? पोलिसांचा अजब शोध

अमृता चौगुले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : फरासखाना आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोस सुरू असलेल्या जुगार अड्डे लुटीचा प्रकार समोर आल्यानंतर काय लपवू, कोठे लपवू असे करत अखेर पोलिसांनी सात जणांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र, त्या जुगार अड्ड्यांचा उल्लेख 'व्हिडीओ गेम सेंटर' असा करण्यात आला आहे. कदाचित तेथे व्हिडीओ गेम सेंटरच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असावेत; परंतु हे जुगार अड्डे कोणाच्या आशीर्वादाने चालू होते याचा शोध पोलिस आयुक्त घेतील का, हादेखील एक सवाल आहे.
दै. 'पुढारी' ने 'जुगार अड्डा लुटला गुन्हेगारांनी' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार समोर आणला होता.
याबातचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. त्यामध्ये तलवार, पिस्तूल आणि कुर्‍हाडीसारखी हत्यारे घेऊन आरोपींनी गल्ल्यातील रोकड लुटून पळ काढल्याचे दिसत होते. अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी दोन्ही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांची झाडाझडती घेत, याबाबतची चौकशी करण्यास पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांना सांगितले होते.
त्यानंतर एकाच दिवशी याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. हा प्रकार शिवाजीनगर आणि बुधवार पेठेतील दोन जुगार अड्ड्यांवर घडला होता. तक्रार घेताना पोलिसांनी व्हिडीओ गेम सेंटर असा उल्लेख केला आहे. मात्र, तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जुगाराचा चार्ट टेबल आणि चिठ्ठ्या फाडताना दिसून येत आहे.
SCROLL FOR NEXT