पुणे: महाराष्ट्र राज्य बिगरशेती सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्तीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. शासनाचे सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी तशी अधिसूचना नुकतीच जारी केली असून, पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पतसंस्थांच्या कामकाजाला दिशा देण्याचे काम पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलमान्वये पतसंस्था नियामक मंडळ गठित करण्याचा निर्णय 31 जानेवारी 2019 रोजी घेतला. त्याअन्वये यापूर्वी मंडळ गठित करण्यात आले. परंतु, यापूर्वीच्या मंडळ सदस्यांची मुदत संपल्यानंतर नव्याने मंडळ गठित करण्यात आले नव्हते. मात्र, त्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याने हा विषय संपुष्टात आल्याचे सहकार आयुक्तालयातून सांगण्यात आले.
पतसंस्था नियामक मंडळातील सदस्यांच्या नियुक्तीमध्ये सूर्यकांत गोविंद जगताप, श्रीकांत जगदीशप्रसाद दुबे यांच्यासह जिजाबा सीताराम पवार, हनुमंत विश्वंभर भुसारे आणि शिवाजीराव विष्णू नलावडे या पाच सदस्यांचा समावेश आहे.
मंडळाचे सहकार आयुक्त दीपक तावरे हे अध्यक्ष आहेत. सहकारचे अपर निबंधक (पतसंस्था) श्रीकृष्ण वाडेकर हे सदस्य असून, सहकार आयुक्तालयातील उपनिबंधक (पतसंस्था) मिलिंद सोबले हे सदस्य सचिव आहेत.
सहकार आयुक्तालयातील तीन अधिकार्यांव्यतिरिक्त मंडळावर सेवानिवृत्ती बँक अधिकारी यांना दोन सदस्यत्व आहे. त्यामध्ये बँकेत उपमहाव्यवस्थापक या पदावर काम केलेले असावे, अशी अट आहे. 10 वर्षे सनदी लेखापाल असलेला एक सदस्य आहे. बिगरशेती कृषी पतसंस्थेचे प्रतिनिधी चार असतात. दरम्यान, गठित मंडळावरील आणखी दोन सदस्यांची नियुक्ती होणे बाकी असल्याची माहिती सहकार आयुक्तालयातून मिळाली.
राज्यात 20 हजारांवर पतसंस्थांचे जाळे
राज्यात नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांची संख्या सुमारे 13 हजार 500 आहे. तसेच, नोकरदार व पगारदार पतसंस्थांची संख्या 6 हजार 500 आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या मिळून एकूण 20 हजार पतसंस्थांचे जाळे राज्यात कार्यरत आहे. त्यातून कोट्यवधी सभासद, ठेवीदारांची सहकारातील पतसंस्थांशी जोडलेले आहेत. त्यामुळे पतसंस्था चळवळीतील अडचणींवर सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी नियामक मंडळाच्या कायद्यान्वये मोठी जबाबदारी आहे.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाबरोबर पतसंस्थांच्या अडीअडचणींवर मध्यंतरी एक बैठक घेतली होती. आता शासनाकडून पतसंस्था नियामक मंडळ सदस्य गठित केले आहे. त्यामुळे पतसंस्थांशी संबंधित जे काही प्रश्न प्रलंबित असतील ते लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.- दीपक तावरे, सहकार आयुक्त, पुणे