आळंदी: गेल्या दोन वर्षांपासून आळंदी नगरपालिकेवर प्रशासक असल्याने अनेक धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी निर्माण होत आहेत. आळंदी नगरपरिषदेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष नसल्याने आळंदीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर याचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.आळंदी शहरातील नागरिकांना सध्या दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे.
सध्या शहरात बोगस नळ कनेक्शन मोठ्या प्रमाणात असून, शहरात येणारे पाणी दररोज नागरिकांना पुरविताना पालिकेला अडचण येत आहे. परिणामी दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण पालिकेने केले आहे. सध्या कार्यकारिणी नसल्याने माजी नगरसेवकांचा म्हणावा तसा वचक अधिकार्यांवर राहिलेला नाही. त्यामुळे अधिकारी देखील माजी नगरसेवकांना बघू, करू, सांगतो अशी बोळवण करणारी उत्तरे देतात. यावरून अनेकदा त्यांच्यात शाब्दिक वाद देखील झाल्याचे चित्र आहे.
नागरिक-नगरसेवक-पालिका प्रशासन असा लोकशाही दुवा होता. तोच प्रशासक राजवटीत संपल्याचे चित्र आहे. नागरिकांना आपल्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने थेट पालिकेत जावे लागते. येथे कधी अधिकारी उपलब्ध असतात.
मात्र, ते कामात व्यस्त असतात, तर कधी ते बैठकीसाठी गेलेले असतात. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हातीच परतावे लागते. पालिकेचे कर्मचारी देखील नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत नाहीत, उद्धटपणे बोलतात अशा अनेक तक्रारी नागरिकांनी या दोन वर्षांत केल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी हा दुवा गरजेचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
निदान तो जनतेला बांधील असल्याने जनतेचे प्रश्न तरी ऐकून घेतो. हे अधिकारी, कर्मचारी शासनाला बांधील असल्याने ते जनतेला गृहीत धरतात, असा नागरिकांचा अनुभव आहे. यामुळेच पालिकेची निवडणूक लवकरात लवकर होऊन लोकप्रतिनिधींचा लोकशाही कारभार सुरू होणे गरजेचे असल्याचे नागरिक आग्रहीपणे सांगत आहेत.