पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नर्हे गावाच्या हद्दीतून वाहणार्या पिराचा ओढा आणि लेंडी ओढा राडारोड्याने ओसंडत आहे. दुसरीकडे दोन्ही ओढ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने लहान-मोठ्या पावसामुळे ओढ्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्यामुळे पावसाळी कामे करणार्या महापालिकेने या ओढ्यातील राडारोडा आणि अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतून वाहणार्या ओढ्यांची व नाल्याची प्रशासनाकडून साफसफाई केली जाते. नाले व ओढ्यातील राडारोडा आणि कचरा पात्राच्या बाहेर काढून पात्र रुंद व खोल करण्यासाठी निविदा काढल्या जातात. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर ओढे व नाले सफाई करण्याकडे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्राधान्य दिले जाते.
मात्र, महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नर्हे गावातून वाहणार्या पिराचा ओढा आणि लेंडी ओढ्याकडे प्रशासनाचे सरळ सरळ दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. लेंडी ओढ्यांचा उगम स्वामीनारायण मंदिरा पाठीमागे, तर पिराच्या ओढ्याचा उगम अंबाईदरा येथून होतो. या दोन्ही ओढ्यांचा संगम काशीबाई नवले हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस शाहू बँकेजवळ होतो. पुढे हा ओढा वडगाव येथील स्मशानभूमी येथून मुठा नदीला मिळतो. या ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा आहे.
या राडारोड्यामध्ये बांधकामाच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात कापडी चिंध्या आणि प्लॉस्टिकचाही समावेश आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने आणि महापालिका प्रशासनानेही या दोन्ही ओढ्यातील राडारोडा काढण्यासाठी काहीच हालचाली केलेल्या नाही. याशिवाय दोन्ही ओढ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी तर ओढ्यावर इमारती बांधण्यात आल्या आहेत. परिणामी, लहान-मोठ्या पावसामुळे ओढ्याच्या परिसरातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरते.
मी मानाजीनगर परिसरात मागील वीस वर्षांपासून राहतो. आजवर केव्हाही प्रशासनाने या ओढ्यामधील राडारोडा आणि अतिक्रमणे काढलेली नाहीत. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नर्हे गावातून वाहणार्या दोन्ही ओढ्यांतील राडारोडा व अतिक्रमणे काढावीत.
– मनोज शिंदे,
नागरिक, मानाजी नगर