पुणे

देहूगाव : येलवाडीतील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईला मुहूर्त मिळेना

अमृता चौगुले

देहूगाव(पुणे) : येलवाडी ग्रामपंचायत हद्दीत 14 ते 15 अनाधिकृत होर्डिंग्ज असून, त्यातील चार ते पाच होर्डिंग्ज अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची मागणी केली जात आहे.

कारवाईकडे दुर्लक्ष

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी हे धोकादायक होर्डिंग्ज काढले जातील ,असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले होते. याशिवाय ज्यांच्या जागेत अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत अशा जागा मालकांनीही होर्डिंग्ज काढण्याबाबत समंती दर्शविली होती. असे असतानाही पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला निघण्याची वेळ जवळ आली तरीही येलवाडी ग्रामपंचायत या अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.

केवळ पाठविल्या नोटीस

नात्यागोत्याच्या राजकारणात ही करवाई होत नसून अनाधिकृत होर्डिंग्ज कोसळून एखाद्या निष्पाप जीवचा बळी गेल्यावर अशा येलवाडी ग्रामपंचायत कारवाई करणार का? असा प्रश्न आता येलवाडी ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. येवलेवाडी परिसरातील अनाधिकृत होर्डिग्ज संदर्भातील वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेवून ग्रामपंच्यायतीने संबंधितांना नोटीस बजावल्या होत्या. परंतु, त्यानंतर पुढे काहीच कारवाई झाली नाही.

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी होर्डिंग्जधारकांनी स्वतःहुन होर्डिंग्ज काढले नाहीत तर ते क्रेन, जेसीबीच्या साहयाने पोलिस बंदोबस्तात काढले जातील आणि सर्व साहित्य जप्त करण्यात येईल, असे आश्वासन सरपंच रंजित गाडे यांनी दिले होते. परंतु, त्यानंतर काहीही कारवाइ करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

येलवाडीगाव हे संत तुकाराम महाराजांच्या कन्येचे गाव आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍यां दिंड्या, वारकरी, भाविक येलवाडी गावात मुक्कामी असतात. दररोज हजारो वारकरी आणि त्यांच्या वाहनांची वर्दळ आसते. त्यांचा विचार करून येलवाडी हद्दीत रस्त्यालगत असलेले धोकादायक होर्डिंग्ज काढणे आवश्यक आहे.
– शिवाजी बोत्रे, माजी सरपंच, येलवाडी

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी सर्व अनाधिकृत होर्डिंग्ज काढणे आवश्यक होते. तसे न करता त्यावर असलेले जाहिरातीचे कापड काढण्यात आले. परंतु, होर्डिंग्जचे सांगाडे मात्र तसेच आजही उभे आहेत. खेड तालुका तहसीलदार आणि जिल्हा परिषद प्रशासनेदेखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सुरेशमहाराज मोरे, वंशज, संत तुकाराम महाराज

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT