हडपसर : पुढारी वृत्तसेवा : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ठेकेदाराने तातडीने वेतन द्यावे, अशी मागणी या कामगारांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधून या कामगारांचे वेतन तातडीने न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 22 आरोग्य कोठ्या असून, त्यांत एकूण 703 कंत्राटी सफाई कामगार काम करतात.
रोज सकाळी सहा वाजता येऊन हे कामगार हडपसर परिसरातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम करतात. मात्र, त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदाराकडून वेतन मिळाले नाही. परिणामी, या कर्मचार्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात एकत्र येत भानगिरे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. या वेळी उल्हास तुपे उपस्थित होते. भानगिरे यांनी तत्काळ खेमनार यांच्याशी संपर्क साधून या कामगारांच्या वेतनाची समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यांना तातडीने वेतन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी त्यांनी दिला आहे.
हडपसर भागातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम कंत्राटी कामगारांकडून केले जात आहे. मात्र, ठेकेदाराने गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना वेतन दिले नाही. अतिरिक्त आयुक्तांनी यात लक्ष घालून कामगारांना तातडीने वेतन देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला कराव्यात.
– प्रमोद भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)
हेही वाचा