पिंपरी : पुण्यामध्ये डासांपासून पसरणारे मझिकाफ, मजेईफ आदी आजाराचे रुग्ण आढळले असले तरी अद्याप पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या आजारांचे रुग्ण तूर्तास आढळलेले नाही. मात्र, याबाबत राज्य शासनाकडून प्राप्त होणार्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
डासांपासून पसरणार्या मजेईफ (जापनीस इन्सेफ्लायटीस) या आजाराचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे.
चार वर्षांच्या मुलाला हा आजार झाल्याचे निदान झाले आहे. त्याचप्रमाणे, डासांपासून पसरणारा झिका विषाणूचा रुग्ण पुण्यात आढळला आहे. बावधन येथील 67 वर्षीय रुग्णामध्ये हा विषाणू आढळला. मात्र, तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. पुण्यामध्ये मजेईफ आणि मझिकाफ या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापलिका याबाबत सतर्क झाली आहे.
डॉ. साळवे म्हणाले, 'मजेईफ आणि मझिकाफ या आजाराचे रुग्ण पुण्यात आढळले असले, तरी तूर्तास पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेले नाही. तथापि, राज्य शासनाकडून प्राप्त होणार्या मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.'
झिका हा डेंग्यू, चिकुनगुणियाप्रमाणेच डासांपासून एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरणारा विषाणू आहे. याची बाधा गरोदर महिलांना झाल्यास जन्माला येणार्या मुलांवर त्याचा परिणाम दिसतो. या आजारात डोळे लाल होणे, प्रचंड डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे आदी लक्षणे दिसतात.
जेई हा आजार विषाणूजन्य आहे. तो क्युलेक्स विष्णोई या जातीच्या डासांपासून पसरतो. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो.