पिंपरी : वर्षा कांबळे : ऑनलाइन शिक्षण आणि व्यवहार करताना अडचणी
कोरोनापासून सर्व गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. कालांतराने सर्व व्यवहार सुरू झाले तरी शाळा आणि महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाइन शिक्षण घेताना वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असलेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ऑनलाइन शिक्षण व व्यवहार करण्यासाठी जी अॅप्लिकेशन्स बनविण्यात आली आहेत. ती दिव्यांगानाही सुलभतेने वापरता येत नाहीत. अॅप बनविताना दिव्यांग व्यक्तींना विचारात न घेत बनविण्यात आली आहेत. येत्या काळात तरी दिव्यांगासाठी डिसेबल फ्रेंडली अॅप्लिकेशन निर्माण करायला हवीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दिव्यांग व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असल्याने प्रत्येक प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीसाठी सुलभ असे अॅप्लिकेशन अद्याप तयार केलेले नाही.
सध्या वापरात असलेले गुगल मीट व मायक्रोसॉफ्ट ही अॅप्लिकेशन पूर्णपणे दिव्यांगाना वापरण्यास सुलभ नाहीत.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असाईंनमेंट या ऑनलाइन द्याव्या लागतात. बर्याच दिव्यांग व्यक्तींकडे कॉम्प्युटर नाहीत. तसेच कॉम्प्युटर असला जरी त्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे त्यांना ऑनलाइन असाईंनमेंट देणे शक्य होत नाही.
शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहेत. त्याचे अॅप्लिकेशन्स दिव्यांगांसाठी अॅक्सेसेबल नाहीत. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा देताना एकट्या दिव्यांग विद्यार्थ्यांला देता येत नाही तर कोणाची तरी मदत घ्यावी लागते.
यामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांना रायटर मिळत नाही. तसेच वीज बिल भरणे, बँकेचे व्यवहार करणे ही कामे दृष्टीहीन स्वत: करू शकतात. तरीही फक्त वेबसाईट अॅॅक्सेसेबल नसल्यामुळे त्यांना ही कामे करण्यासाठी दुसर्या व्यक्तीवर अवलंबून रहावे लागते.
कारण केंद्र सरकारच्या एकाही वेबसाईटमध्ये स्क्रिन रिडर सॉफ्टवेअर नसल्यामुळे अंध व्यक्तींना सहजरित्या वापरता येत नाहीत. तसेच अस्थिव्यंगांना बोलून वापरता येणारे अॅप पाहिजे.
तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांना व्हिडीओसोबत कॅप्शन किंवा समरी दिली पाहिजे. सर्वच दिव्यांगाचा विचार करुन स्टॅण्डर्ड अॅप बनविले पाहिजे.
कॅशलेस व्यवहार करता येत नाही
ओला, उबेर ही अॅप्लिकेशन्स तसेच खाद्य पदार्थांचे वेगवेगळी अॅप आहेत. पण ही डिसेंबल फ्रेंडली नसल्याने दिव्यांगांसाठी वापरता येत नाहीत.
नोटबंदीपासून आणि आता कोरोनामुळे कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. हे व्यवहार करताना गुगल पे सोडले तर कोणतेच अॅप्लिकेशन अॅक्सेस होत नाही. त्यामुळे बँकांचे किंवा इतर कोणतेही व्यवहार करताना दिव्यांग व्यक्तीला दुसर्याची मदत घ्यावी लागते.
"दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने स्टॅण्डर्ड अॅप्लिकेशन बनवायला हवीत. कोणत्याही महाविद्यालयांच्या वेबसाईट अॅक्सेसेबल नाहीत.
दिव्यांगासाठी अॅक्सेसेबल अॅप बनविले तर ते अधिक स्वावलंबी होवू शकतात. या गोष्टी समाजासमोर कोणीही मांडत नाहीत.
विद्यापीठाच्या परीक्षेचे जे अॅप आहे ते विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे सुलभ असले पाहिजे. पण तसे नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देताना खूप त्रास झाला.
ऑनलाइन परीक्षा घेत असताना महाविद्यालये विद्यापीठांनी सर्व प्रकारच्या दिव्यांगांचा विचार करुन एक स्टॅण्डर्ड अॅप बनविले.तर ते जास्त सुलभ होईल."
-धनंजय भोळे, समन्वयक, दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक शिक्षण केंद्र, शिक्षण शास्त्र विभाग पुणे विद्यापीठ