फुरसुंगी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत समावेश होऊन अकरा गावांना सहा, तर तेवीस गावांना दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र, या गावांत मूलभूत सुविधांची वाणवा, लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांची वाढलेली मुजोरी आणि विकासकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गावांची फरफट थांबविण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, या गावांच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली आहे. या गावांत गेल्या काळात ग्रामपंचायतींनी पुरविलेल्या सुविधा मोडकळीस आल्या आहेत. नागरिकरणाचा भार वाढला आहे. नागरिकांना सध्या पाणी, सांडपाणी, आरोग्य, पथदिवे आणि रस्त्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गावांत वाहतुकीचे नियोजन नाही. कर घेऊनही एकही सुविधा मिळत नाही. अधिकारी गंभीर नाहीत. त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. समाविष्ट ३४ गावांचा विकास आराखडा झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत लागत असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.
समाविष्ट गावांच्या मूलभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आदी सुविधांना प्राधान्य दिले आहे. घनकचरा व्यवस्थापन चांगल्याप्रकारे चालू आहे. क्षेत्रीय अधिकारी पातळीवर विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका