पुणे

चांदे सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

अमृता चौगुले

पौड(ता. मुळशी); पुढारी वृत्तसेवा : चांदे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक बाजीराव ओव्हाळ यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. ओव्हाळ यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रतीक्षा काळुराम मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश मांडेकर, नीलेश मांडेकर, सीमा ससार, रेश्मा खाणेकर व उमा गायकवाड आदी सदस्यांनी अविश्वासदर्शक ठराव दाखल केला होता. ठरावात सरपंच ओव्हाळ हे मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार करतात, सदस्यांना विश्वासात घेत नाहीत व परस्परच निर्णय घेतात, सदस्यांची कुठलीही मते विचारात घेतली जात नाहीत, असे म्हटले होते.

तहसीलदार अभय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सहाविरुद्ध एक अशा मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. प्रतीक्षा मांडेकर यांच्यासह उर्वरित पाच सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. ओव्हाळ यांच्यावरील अविश्वास ठराव सहाविरुद्ध एक मताने मंजूर केल्याचे तहसीलदार चव्हाण यांनी जाहीर केले.

अविश्वास ठरावावेळी ओव्हाळ यांनी त्यांच्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अविश्वास ठरावाच्या बाजूने सातपैकी सहा सदस्यांनी मतदान केले. चांदे हे गाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि शिवसेना नेते शंकर मांडेकर यांचे आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शंकर मांडेकर यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या होत्या. विरोधी पॅनेलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मांडेकर यांच्या गटाकडे ग्रामपंचायत आली. मात्र, सरपंचपद विरोधी गटाकडे गेले होते.

SCROLL FOR NEXT