पुणे : पुढारी वृत्तेसवा : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी 27 अर्ज, तर चिंचवड मतदारसंघासाठी 20 उमेदवारांनी 34 अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली, तरी अद्यापही कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि.7 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे शहराचे प्रांताधिकारी स्नेहा किसवे यांची नियुक्ती केली आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिंचवडमध्ये 20 उमेदवारी अर्जांचे वाटप
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) पहिल्याच दिवशी इच्छुकांनी 20 अर्ज नेले. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी या राजकीय पक्षासह 14 अपक्ष इच्छुकांचा समावेश आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी मंगळवार (दि. 31) अर्ज वाटप व स्वीकृतीस सुरुवात झाली.