पुणे

पिंपरी : निवडणूक निर्णय अधिकार्‍याचा नाही पत्ता; निवडणुकीसाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी विविध विभागांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे आदर्श आचारसंहिता राबविण्याबाबत ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. अधिकार्‍यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या मंगळवार (दि.31) पासून उमेदवारीअर्ज स्वीकारले जाणार आहेत.

तर, 26 फेबु—वारीला मतदान होऊन 2 मार्चला मोजणी होणार आहे. या सर्व कामकाजासाठी पालिकेचे 245 अधिकारी व कर्मचार्‍यांकडे विविध जबाबदार्‍या सोपविल्या आहेत. निवडणूक जाहीर होऊन आठ दिवस उलटले तरी, अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त न केल्याने शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्यामुळे निवडणूकविषयक कामकाजाने जोर धरलेला नाही.

आदर्श आचारसंहितेचे भंग केल्याप्रकरणी कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जबाबदारी निश्चित न केल्याने अधिकारी जबाबदारी झटकून हात वर करीत आहेत. तक्रारींवर कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख हे निवडणूक निर्णय अधिकारी असतात. मात्र, उपायुक्त सचिन ढोले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अद्याप घोषणा झालेली नाही, त्यामुळे निवडणुकीसंदर्भातील कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

अधिकार्‍यांकडे आहे ही जबाबदारी
मतदान कर्मचारी नेमणुकीसाठी इ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मतदान कर्मचारी प्रशिक्षण नियोजन व व्यवस्थापन विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, टपाली मतदानासाठी सहाक आयुक्त राजेश आगळे, निवडणूक साहित्य संकलन व वितरणासाठी भांडार अधिकारी मुबारक पानसरे, मतदान यंत्रे व स्ट्राँग रूमची जबाबदारी सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, निवडणूक कर्मचारी भत्ता वाटपाची जबाबादारी लेखाधिकारी अरुण सुपे, वाहन परवाना देण्यासाठी प्रशासन अधिकारी राजीव घुले यांची नियुक्ती केली आहे.

आचारसंहिता कक्षासाठी कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, मीडिया सेलसाठी विशेष अधिकारी किरण गायकवाड, वाहन अधिग्रहण विभागासाठी कार्यव्यवस्थापक कैलास दिवेकर, वाहतूक आराखडा व व्यवस्थापनासाठी पीएमपीएलचे डीएमइ दत्तात्रय माळी, उमेदवार खर्चाचे बिले तपासणीसाठी लेखाधिकारी इलाही शेख, चिन्हांकित मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

विभागानुसार कर्मचार्‍यांची नियुक्ती
मतदार केंद्राध्यक्ष, अधिकारी असे 12 अधिकारी नेमले आहेत. कर्मचारी प्रशिक्षण नियोजन व व्यवस्थापनासाठी 7 कर्मचारी, टपाली मतदानासाठी 11, निवडणूक साहित्य संकलन व वितरणासाठी 24, मतदान मशिन (ईव्हीएम) व स्ट्रॉग रूमसाठी 42, निवडणूक कर्मचारी भत्ता वाटपासाठी 12, वाहन परवाने व उमेदवार प्रतिनिधी ओळखपत्र वाटप 9 आणि आचासंहिता कक्षासाठी 16 कर्मचारी नेमले आहेत.

विविध भरारी पथके 18, मीडिया सेलसाठी 6, निवडणूक वाहन सुविधेसाठी 7, वाहतूक आराखडा व व्यवस्थापनासाठी 8, निवडणूक खर्चाची बिले तपासण्यासाठी 12, चिन्हांकित मतदार यादी तयार करण्यासाठी 36, निवडणूक विषयक संगणकीकरण 7, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी 18 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. असे एकूण 245 अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजांसाठी नेमण्यात आले आहेत. निवडणुकीचे कामकाज थेरगाव येथील क्षेत्रीय कार्यालयातून केले जाणार आहे. त्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT