Nirmala Nawale Karegaon Sarpanch Video Viral: पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यात त्यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर आरोप केले आहेत.
कारेगाव पंचायत गटातून त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात उतरल्या होत्या. मात्र भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव केला. निकालानंतर सोशल मीडियावर निर्मला नवले म्हणाल्या, “या निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला… पण माझा संघर्ष थांबणार नाही”
व्हिडीओमध्ये त्या म्हणतात, हा पराभव अनपेक्षित होता. तरीही ज्या हजारो मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मात्र विकासाच्या मुद्द्यांपेक्षा यावेळी पैसा आणि व्यसनांचा वापर या निवडणुकीत झाला याचं दुःख आहे, असही त्या म्हणाल्या.
निर्मला नवले म्हणाल्या की, पैशांच्या जोरावर मतं मिळवता येतील, पण लोकांची निष्ठा विकत घेता येत नाही. गावातील तब्बल 30 ते 40 तरुण व्यसनांच्या गर्तेत अडकले आहेत. आपल्या गावात तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाताना पाहणं हे कोणत्याही पराभवापेक्षा जास्त वेदनादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. “राजकारण कितीही खराब असलं, तरी लोकांसाठी काम करण्याची माझी जिद्द संपलेली नाही,” असं त्या ठामपणे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, आज राजकारणात उतरायचं असेल, तर आधी पैसा जमवायचा आणि मग तो वाटायचा, अशी परिस्थिती तयार झाली आहे. मतदार पैशासाठी विकले जात आहेत, हे पाहून मन खचतं, असं त्यांनी सांगितलं. या वेळी त्यांना अजित पवारांचे शब्द आठवले “राजकारण खूप वाईट आहे.”
दरम्यान, निर्मला नवले यांच्या या व्हिडीओमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, निवडणुकीतील पैशांचा वापर आणि तरुणांमधील व्यसनाधीनता या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.