येरवडा : पुढारी वृत्तसेवा : 'पुणे शहरातील विद्यार्थी, महिला तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह वाढती व्यसनाधीनता व गुन्हेगारी रोखण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने निर्भय विद्यार्थी अभियान हा उपक्रम उपयोगी ठरेल,' असे मत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
पुणे शहर पोलिसांच्या वतीने परिमंडळ चार विभागातील शाळांचे मुख्याध्यापक व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, आरोग्य शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, महापालिका माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, एएम इन्फोवेब फाउंडेशनचे प्रमुख अली मर्चंट, मुक्तांगण संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर आदी उपस्थित होते.
निर्भय विद्याीर्र् अभियानांतर्गत पुणे पोलिसांच्या वतीने पोलिस काका, पोलिस दीदी, दामिनी पथक, बडीकॉप,परिवर्तन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली. एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या वतीने या वेळी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना रेनकोटचे वाटप केले. प्रास्ताविक दिलीप कुर्हाडे यांनी केले.
सामाजिक संस्था करणार विद्यार्थ्यांचे समुपदेशन
शाळा महाविद्यालयातून निर्भय मित्र व निर्भय सखी विद्यार्थी प्रतिनिधी नेमण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. मुक्तांगण, सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, सीवायडीए, लोकविकास मंडळ, पुणे जनकल्याण ट्रस्ट, स्पर्श सेंटर, स्त्री-आधार संस्था, महिला कल्याण केंद्र, मुस्कान, सर्व सेवा संघ, विती फाउंडेशन, ग्रीन तारा फाउंडेशन, होप या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींना विद्यार्थ्यांशी सुरक्षेसह महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधण्यासाठी प्रशिक्षण दिले. परिसरातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार असल्याचे या वेळी पोलिस अधिकार्यांनी सांगितले.