बावडा: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. १९) सराटी (ता. इंदापूर) येथे मुक्कामासाठी येत असून, सोमवारी (दि. २०) सकाळी निरा नदीपात्रात पादुकांचा पारंपरिक शाही निरास्नान सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
दरम्यान, पाण्याअभावी कोरडे पडलेल्या निरा नदीपात्रात वीर धरणातून सोडलेले पाणी शुक्रवारी (दि. ११) दाखल झाल्याने निरा स्नानासाठी निर्माण झालेली पाण्याची चिंता दूर झाली असून, वारकऱ्यांसह ग्रामस्थ आणि प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांच्या निरास्नानाचा धार्मिक विधी हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने या विधीसाठी पाण्याची उपलब्धता करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
मात्र, घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर आणि वीर या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. पूरनियंत्रणासाठी ८ जुलैपासून वीर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी ११ जुलै रोजी सराटी येथे पोहचल्याने निरा नदी पुन्हा वाहती झाली आहे. त्यामुळे पादुकांच्या शाहीस्नानासाठी तसेच वारकऱ्यांच्या पाण्याच्या गरजेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाले आहे.
२०२३ मध्ये टँकरच्या पाण्यावर झाला होता निरास्नान विधी
२०२३ मध्ये निरा नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने पादुकांच्या शाहीस्नानासाठी प्रशासनाला टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे लागले होते. यंदाही आठवडाभरापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, वरुणराजाच्या कृपेने निरा नदी पुन्हा वाहू लागल्याने प्रशासनासह वारकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.