शिवनगर: बारामती (पुणे) आणि फलटण (सातारा) तालुक्याला जोडणारी निरा नदी ही दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात सापडत चालली आहे. या प्रदूषणामुळे जलचर प्राण्यांसह परिसरातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. नदीतील दुर्गंधीमुळे परिसरातील सांगवी, शिरवली व इतर गावांतील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
फलटण तालुक्यातील कत्तलखाने, दूध प्रकल्प संस्था, साखर कारखाने तसेच फलटण नगरपरिषद यांचे दूषित व रसायनमिश्रित सांडपाणी सोमंथळी बंधारा परिसरातून निरा नदीत येते. कोणतीच प्रक्रिया न करता पाणी निरा नदीत सोडल्याने नदीतील मासे मृत्युमुखी पडतात. हे मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसतात.
या नदीच्या प्रदूषणामुळे अनेक गावातील शेती खराब झाली आहे. तसेच शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही अनेक वर्षांपासून ही समस्या जैसे.. थे.. आहे. आतातरी प्रदूषणास जबाबदार असलेल्या संस्थांवर महाराष्ट्र शासन तथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माळेगाव कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.
देवालाही हेच पाणी
निरा नदीच्या पाण्याला प्रदूषणामुळे उग््रा वास येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असले तरी या गावांमधील नागरिकांना देवघरातील देवांनाही याच पाण्याचे धुवावे लागते. परिणामी देव काळे पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा दुसरा पर्याय नसल्याने हेच रसायनमिश्रित दूषित पाणी द्यावे लागत आहे. हे पाणी शेतीला दिल्यामुळे शेती नापीक व निकृष्ट प्रकारची बनली असून, तिचा पोत खराब झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचे जीवन तथा उपजीविका शेतीवर आहे त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.विजय श्रीरंग तावरे, संचालक, माळेगाव साखर कारखाना
आरोग्य धोक्यात
शेतकरीबांधव हे दूषित पाणी शेतीला पाटाद्वारे देतात. त्यावेळी या पाण्याचा हाताशी व पायाशी संबंध येतो. त्यामुळे हाताला व पायाला खाज सुटून पुरळ येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच या पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे.
अनेक वर्षांपासून निरा नदीचा हा प्रदूषणाचा प्रश्न असून, या समस्येवर पुणे व सातारा जिल्ह्यातील अधिकारी एकमेकांवर टोलवाटोलवी करत आहेत. आता मात्र या दोन्ही जिल्ह्यांतील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करून संबंधित संस्थांवर तातडीने कडक कारवाई करावी.प्रमोद रामचंद्र तावरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, सांगवी