Farmer Waiting for Rain Pudhari
पुणे

Nira Farmer Crisis: निरा परिसरात पावसाची दडी; खरिपाच्या पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत

जून महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस न आल्याने बाजरी व सोयाबीन पेरणी थांबली असून शेतकरी आर्थिक संकटाच्या भीतीत आहेत

पुढारी वृत्तसेवा

निरा: जून महिन्यातील दोन आठवडे संपले, तरी निरा (ता. पुरंदर) आणि परिसरात पावसाने दडी मारली आहे. सध्या या भागातील पेरणीपूर्व सर्व कामे झाली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरीप हंगामाला ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे बळीराजाने मागील काही आठवड्यांपासून शेतीची नांगरणी, कुळवणी तसेच शेतातील दगड, झुडपे आणि तण काढण्याचे काम पूर्ण केले आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यास बळीराजा कृषी सेवा केंद्राकडे वळू लागले आहे.

साधारणपणे निरा खोऱ्यात खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन व १ जुलैला आडसाली उसाची लागण होत असते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने निरा व परिसरात खरिपातील बाजरी व सोयाबीन या पिकांची पेरणी झालेली नाही. त्यामुळे पेरण्या उशिरा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

पर्यायाने आर्थिक संकट ओढवण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. जूनचा‌‌‌ दुसरा‌ आठवडा संपला‌ तरी पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे बाजरीची पेरणी करता आली नाही. आणखी चार-पाच दिवस पावसाची वाट पाहून विहिरीच्या पाण्यावर बाजरीची पेरणी करण्याच्या विचारात आहे.
बाळासाहेब गायकवाड, शेतकरी, पिंपरे खुर्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT