माळेगाव पुढारी वृत्तसेवा : माळेगाव नगरपंचायत हद्दीतील निरा-बारामती राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा त्रास वाहनचालक व स्थानिक नागरिकांना होत आहे. संपूर्ण रस्ताच उकरून ठेवल्याने अपघाताची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी तीव— नाराजी व्यक्त केली आहे.
माळेगाव नगरपंचायत परिसरातील निरा-बारामती राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली माळेगाव राजहंस चौक ते इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत या रस्त्याचे काम केले जात आहे. गेले काही महिने हे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रॉम वॉटर गटराचे काम सुरू आहे. असे असताना रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण रस्ता उकरण्यात आला आहे.
निरा-बारामती राज्य मार्ग हा रहदारीचा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याच्या एक बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसर्या बाजूने रस्ता उकरणे आवश्यक होते. परंतु, तसे न केल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर काही ठिकाणी खडी वर आली असून, वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरत आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याचे डांबरीकरण सुरू करावे, अशी मागणी होत आहे.