Boy Drowned in Pachane village
Somatane: पाचाने येथील खाणीत रविवारी रात्री नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. सुरज सुनील भोसले (वय वर्ष ९) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देहूरोड येथील भोसले कुटुंबीय आंब्यांची राखण करण्यासाठी पाचाने या गावी आले होते. दुपारी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेले असताना सुरज हा परिसरात खेळत होता. सायंकाळी उशिरापर्यंत सुरज दिसून न आल्याने त्याचा शोध घेऊ लागले. रात्री उशिरा खाणीजवळ त्याचे कपडे मिळून आल्याने तो खाणीत बुडाला असल्याचा संशय कुटुंबियांना आला. (Pune News Update)
तो बुडाल्याची माहिती मिळताच सुरजच्या कुटुंबियांनी या संदर्भात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनला फोन द्वारे माहिती कळवली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची खबर मिळताच पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस पाचारण केले. एका तासाच्या अथक परिश्रमानंतर रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास सुरजाच्या मृतदेह शोधून काढण्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस यश आले. पोट भरण्यासाठी पाचाने गावात आलेल्या भोसले कुटुंबीयांवर चिमुकल्याच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव परंदवडी पोलीस करीत आहेत.