पुणे

शहरात कचरा साठणारी नऊशे ठिकाणे; 161 स्पॉट कचरामुक्त

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात कचरा टाकला आणि साठला जाणारे नऊशे 'क्रॉनिक स्पॉट' (ठिकाणे) आढळून आले असून हडपसर- मुंढवा आणि नगर रस्ता- वडगाव शेरी या दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 'क्रॉनिक स्पॉट' आढळून आले आहेत. दरम्यान, 161 'स्पॉट' कचरा मुक्त केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे महापालिकेने सहभाग घेतला आहे.

या अनुषंगाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छतेसंदर्भात विविध उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये शहरात कचरा टाकण्यात येणारे आणि साठून राहणारे 'क्रॉनिक स्पॉट ' शोधून काढले जात आहेत. या कामात कुचराई किंवा हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगादेखील उगारला जात आहे. या कामाचा दैनंदिन अहवाल संकलित केला जात असून पालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आतापर्यंत 913 क्रॉनिक स्पॉट आढळून आले. हे सर्व स्पॉट उपनगरातील असून महामार्गालगत असलेल्या भागात या स्पॉटची संख्या अधिक आहे. वारजे, औंध, हडपसर, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या भागातून हे महामार्ग जात आहे. या महामार्गालगत नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे.

क्रॉनिक स्पॉटवर पडणारा कचरा गोळा करण्यासोबतच सदर स्पॉटवर रांगोळी काढणे, कुंड्या ठेवून सुशोभीकरण करणे व बसण्यासाठी बाकडी ठेवणे, आदी कामे केली जात आहेत. याशिवाय कचरा टाकणाार्‍यांवर दंडात्मक कारवाई, कचरा गोळा करणार्‍यांकडे कचरा का दिला जात नाही, याची माहिती नोंदवून संबंधित यंत्रणेकडे कचरा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

क्रॉनिक स्पॉट आणि कचरामुक्त स्पॉट

1) नगर रस्ता – वडगांव शेरी : 131 : 24
2) येरवडा – कळस – धानोरी : 37 : 2
3) ढोले पाटील रस्ता : 24 : 0
4) औंध – बाणेर रस्ता : 63 : 17
5) शिवाजीनगर – घोलेरोड : 40 : 8
6) कोथरूड – बावधन : 4 : 0
7) धनकवडी – सहकारनगर : 36 : 0
8) सिंहगड रोड : 98 : 7
9) वारजे – कर्वेनगर : 43 : 2
10) हडपसर – मुंढवा : 153 : 71
11) कोंढवा – येवलेवाडी : 87 : 9
12) वानवडी – रामटेकडी : 49 : 8
13) कसबा – विश्रामबागवाडा : 59 : 10
14) भवानी पेठ : 21 : 0
15 ) बिबवेवाडी : 44 : 3

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT