आवर्तन सुटूनही निमोणेकर पाण्यापासून वंचित; पिके वाया जाण्याची भीती Pudhari
पुणे

आवर्तन सुटूनही निमोणेकर पाण्यापासून वंचित; पिके वाया जाण्याची भीती

निमोणे येथील तळे अजूनही कोरडे

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: गावातील तळे दरवर्षी चासकमान धरणाच्या पाण्याने भरले जाते. मात्र चासकमानचे आवर्तन सुरू असूनदेखील अजूनही या तळ्यात पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे तळे कोरडेच आहे. परिणामी, गावातील ग्रामस्थ चिंतेत असून, तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी करत आहेत.

गावातील अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावा केला आहे. तसेच चासकमान धरण अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क साधूनही अद्यापि कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती आहे.

गावातील पक्षांतर्गत वादामुळे तळे भरण्याचा प्रश्न वेठीस धरला गेला आहे. राजकीय मतभेदांमुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. जर वेळेत पाणी मिळाले नाही, तर शेतकर्‍यांचे पीक वाया जाईल. यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावातील शेततळे भरले गेले नाही, तर गावठाणामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल. हा प्रशासनाचा गलथान कारभार असून, पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे निमोणेच्या गावतळ्यामध्ये पाणी येऊ शकले नाही, असा आरोप तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष अप्पाराव काळे यांनी केला आहे.

तर चासकमान अधिकार्‍यांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते. विनंती करूनही निमोणेच्या तळ्यात पाणी सोडलेले नाही. तसेच, निमोणे ग्रामपंचायत येथील अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडूनही सहकार्य मिळत नाही, असा आरोप भाजपचे कार्यकर्ते जे. आर. काळे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT