निमोणे परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक Pudhari
पुणे

Nimone Farmers Fraud: निमोणे परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक; गुऱ्हाळ चालकांनी केला लाखोंचा गंडा

विश्वासावर ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळेना; एजंट आणि चालक दोघेही बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरातील शेतकऱ्यांना दौंड व हवेली तालुक्यातील काही गुऱ्हाळ चालकांनी अक्षरशः लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. तीन हजारांपुढे बाजारभाव देतो, असे स्वप्न दाखवून या गुऱ्हाळ चालकांनी या भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला. विशेष म्हणजे नातेसंबंधातीलच एखादा एजंट शेतकऱ्यांना गुऱ्हाळ चालकांची भेट घडवून देतो, सगळा तोंडी व्यवहार असल्यामुळे गुऱ्हाळचालक चार शेतकऱ्यांचे पैसे देणार तर दहा जणांचे पैसे बुडवणार असाच दुर्दैवी प्रकार या परिसरातील शेतकऱ्यांबाबत घडला आहे. (Latest Pune News)

ऊस तोडून चार महिने झाले, माझे तीन महिने झाले. पाहुण्याने गुऱ्हाळ चालक दाखवला, लय विश्वासाने ऊस दिला राव.. कुणाचा 100 टन, कोणाचा 200, तर कोणाचा 50 टन, रात्रंदिवस घाम गाळून पिकवलेला ऊस गाळपासाठी आल्यानंतर या परिसरातील हक्काचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने परिसरातील खासगी साखर कारखाने किंवा गुऱ्हाळ याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही.

गुऱ्हाळ चालक चांगला तर देतो अशा पद्धतीची जाहिरात करणारे काही एजंट गोड बोलून शेतकऱ्याचा विश्वास संपादन करतात. विशेष म्हणजे एजंट म्हणून काम करणारे हे त्या शेतकऱ्याच्या जवळचे नातेवाईकच असतात. आपला पाहुणा आपल्याला फसवणार नाही या वेड्या समजुतीतून शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ चालकाला ऊस घातला, पुढे पेमेंट अडकले आहे.

ना कसला करार, ना धनादेश हे सगळे विश्वासाच्या जोरावर झाले. आजच्या घडीला अनेक शेतकरी धायमुकलून रडत आहेत. पोलिस ठाण्यात जायचं म्हटलं तर ऊस दिला याला काहीच पुरावा नाही.. पाहुण्याच्या भरवशावर गुऱ्हाळ चालकाने शेतकऱ्यांचा विश्वासाने गळा कापला.. दोन दिवस थांबा तुमचं सगळं पेमेंट देतो, याच्यापुढे गुऱ्हाळ चालक काहीच बोलायला तयार नाही. मध्यस्थ पाहुण्याशी संपर्क केला, पेमेंट पुढे अडकले.. पेमेंट सुटलं की आपण सुटू..हीच टीमकी वाजवली जाते. शेतकऱ्यांची मात्र प्रचंड मोठी फसवणूक झाली आहे.

फसवणूक झालेले शेतकरी हताश

पोलिसांकडे जावे तर गुन्हा दाखल होईल आणि न्यायालयाचं काम वर्षानुवर्ष चालत राहील. ‌‘आपण कर्ज काढून ऊस वाढवला. तोडणीला आलेला ऊस चालकाच्या हवाली केला. पिकाच्या भरवशावर देणेदारांना वायदा केला, आज ऊस गेलाय त्यामुळे देणेदार घराकडे घिरट्या घालतात. पैसे मिळाले तर सगळी समस्या संपेल. अस वाटतंय त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, पण विषय वाढला तर आम्ही अडचणीत येऊ. आमचं पैसे अडकल्यात..काय करावं तेच कळत नाही‌’, अशा हताश प्रतिक्रिया फसवणूक झालेले शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT