पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आरोपी नीलेश चव्हाण याचा मुक्काम आत्ता येरवडा कारागृहात असणार आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने नीलेश याला शनिवारी (दि. 7) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
तपासादरम्यान, वैष्णवी यांची सासू लता, नणंद करिष्मा आणि पती शशांक यांचे मोबाईल नीलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले आहेत. नीलेश चव्हाण व इतर आरोपींमध्ये मोबाईलच्या माध्यमातून झालेले संभाषण व मेसेज तपास जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Latest Pune News)
चव्हाणने बाळाशी कोणती गैरवर्तणूक केली आहे. नीलेश आणि इतर आरोपींमध्ये नेमके काय संभाषण झाले? चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील सदस्य यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यातून हा गुन्हा करण्यात आला आहे का? याचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
यावेळी, चव्हाण याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात यावी, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची नोंदणी प्रत प्राप्त करण्यात आली आहे. शशांक आणि वैष्णवी हिचे मोबाईलमधील व्हॉटसअप चॅट स्क्रिनशॉट पोलिसांनी जप्त केले आहे. बचाव पक्षाकडून अॅड. स्वानंद गोविंदवार यांनी युक्तिवाद केला.
वैष्णवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय 63), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय 27), पती शशांक राजेंद्र हगवणे (वय 27), सासू लता राजेंद्र हगवणे (वय 54), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय 31) यांना न्यायालयाने यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हगवणे माय-लेकांसह सहा जणांना न्यायालयीन कोठडी
जेसीबी खरेदी विक्री व्यवहारात फसवणुकीच्या गुन्ह्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता यांच्यासह सहा जणांना खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शनिवारी (दि. 7) न्यायालयीन कोठडी सुनावली.
जेसीबी जप्त करण्यात सहभागी असलेले योगेश राजेंद्र रासकर, वैभव मोहन पिंगळे, गणेश रमेश पोतले आणि प्रणव तुकाराम साठे हे चौघे जण याप्रकरणी सहआरोपी आहेत. त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी सकाळी म्हाळुंगे पोलिसांनी खेड न्यायालयात हजर केले. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली आहे.