पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी या ग्रेडसेपरेटर मार्गावर नव्याने स्वतंत्रपणे मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या जलवाहिनीद्वारे शहराचे शेवटच्या भाग असलेल्या दापोडी व सांगवी परिसराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच, या मार्गावर निर्माण होणार्या टोलेजंग इमारतींना पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
शहर चारही बाजूने वाढत असून, लोकवस्ती वाढत आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने पवना नदीतून 510 एमएलडी, एमआयडीसीचे 30 एमएलडी आणि आंद्रा धरणाचे 50 एमएलडी असे एकूण 590 एमएलडी पाणी सद्यपरिस्थितीत शहराला कमी पडत आहे. परिणामी, पालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
शहराचे शेवटचे टोक असलेल्या दापोडी, सांगवी या परिसरापर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होतो. तसेच, काही वेळा कमी प्रमाणात पाणीपुरवठा होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी निगडीच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते दापोडीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडून 1,000 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शेवटच्या भागात जलवाहिनी 600 मिलिमीटर व्यासाची असणार आहे.
ही जलवाहिनी निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्पाच्या बाजूने सर्व्हिस रस्त्याने दापोडीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या स्वतंत्र जलवाहिनीमुळे शहराचा शेवटच्या भागातील दापोडी व सांगवी परिसराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. तसेच, दापोडी ते चिंचवड मेट्रो मार्गामुळे एफएसआय वाढल्याने टोलेजंग इरमाती उभ्या राहत आहेत. या दापोडी ते निगडी मार्गावरील नव्या शेकडो निवासी इमारतींना या जलवाहिनीतून पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या इमारतींना पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. या कामाचा उल्लेख पालिकेच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
शहराची गरज ओळखून निगडी ते दापोडी अशी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या जलवाहिनीद्वारे दापोडी व सांगवी परिसराला पाणी देण्याचा हेतू आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. या कामासाठी सुमारे 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्थापत्य प्रकल्प विभागाकडून निगडी ते दापोडी मार्गावर पदपथ व सायकल ट्रॅक बनविण्यात येत आहे. ते काम सुरू होण्यापूर्वी जलवाहिनीचे काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.