पुणे

कवडीपाट-कासुर्डी भागाकडे ‘एनएचएआय’चे दुर्लक्ष

अमृता चौगुले

उरुळी कांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन हद्दीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्यासाठी अतिक्रमणे व मुख्य चौकातील अरुंद रस्ते कारणीभूत ठरत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करणे हा फक्त तात्पुरता उपाय ठरत असून, भविष्यात मोठी कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंजूर झालेला भुयारी मार्ग प्रत्यक्षात कधी उतरविणार व महामार्गाच्या एकूण हद्दीत झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी धारिष्ट्य दाखविणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (क्र. 65) कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान वाहतूक कोंडीची मोठी समस्या तयार झाली आहे.

संबंधित बातम्या :

उरुळी कांचन हद्दीत तर वाहतूक कोंडीने स्थानिक व प्रवासी प्रचंड प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिकांना व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना वाहतूक कोंडीत अडकून बसण्याची परिस्थिती उद्भवल्याने समस्या किती जटील होत चालली आहे, याचा प्रत्यय येत आहे. कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान वाहतूक कोंडीला मानवनिर्मित ठळक कारणे कारणीभूत असली तरी या दरम्यानच्या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती, अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली नसल्याने या भागात खिंडीतील वाहतुकीप्रमाणे या भागात प्रवास होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

गेल्या चार वर्षांपूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होऊनही रस्त्यासाठी शून्य प्रयत्न झाल्याचे दिसते, त्यामुळे वाहतुकीचा श्वास मजैसे थेफच कोंडत आहे. प्राधिकरणाने या बेवारस झालेल्या रस्त्याच्या सुधारणेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने रस्ते वाहतूक व अपघातांचे प्रमाण अधिक बनले आहे. या महामार्गावरून मान्यवर मंडळी प्रवास करीत असतील तर तेवढीच तात्पुरती सुधारणा होते. प्राधिकरणाने वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने लोणी काळभोर, थेऊर, उरुळीकांचन या मुख्य ठिकाणांवरील मंजूर झालेले भुयारी मार्ग तयार करण्यातही स्वारस्य दाखविले नसल्याने परिस्थितीवर मार्ग निघत नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा अधिनियमांतर्गत महामार्गाला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तत्काळ काढून टाकण्याची जबाबदारी असताना प्राधिकरण या कारवाईबाबत
गांभीर्य दाखवित नसल्याने प्राधिकरणाचा चालढकलपणा समस्येत भर घालत आहे.

प्राधिकरणाचा कारवाईसाठी पत्रव्यवहार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान अतिक्रमणांवरील कारवाईसाठी प्राधिकरणाच्या मुंबई येथील विभागीय कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान अतिक्रमणे काढण्यासहित देखभाल-दुरुस्तीस एजन्सी नेमणे, खर्चाची तरतूद व पोलिस बंदोबस्ताच्या मदतीसाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. लवकरच या ठिकाणी महामार्गाच्या सुरक्षितेसाठी उपाय करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT