वारजे: वारजे परिसरातील रामनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अचानक चौक यादरम्यान सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी असलेली जुनी सांडपाणी वाहिली न काढता त्याशेजारीच नवीन वाहिनी टाकण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने हे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याचे रहिवाशांनी सांगितले तसेच या कामच्या दर्जावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या काळात ’मार्च एंडिंग’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य खात्याकडून रामनगर परिसरातील विविध ठिकाणी सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अचानक चौक यादरम्यानच्या कामाचाही समावेश आहे. मात्र, या रस्त्यावरील जुनी ड्रेनेज लाइन न काढता त्याशेजारीच नवीन लाइन टाकण्यात आली आहे. (Latest Pune News)
रहिवासी बापू बनसोडे म्हणाले की, या ठिकाणी टाकण्यात आलेल्या नवीन वाहिनीतून सांडपाणी वाहून जात नाही. शेजारी असलेल्या जुन्या वाहिनीचा चेंबर भरला की त्यामधून टाकण्यात आलेल्या लहान पाइपमधून सांडपाणी नवीन वाहिनीत जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, नवीन वाहिनीवर चेंबरची दुरुस्ती व्यवस्थित न केल्यामुळे नुकतेच रस्त्यावर सांडपाणी आले होते. जुन्या वाहिनीतूनच सांडपाणी जाणार असेल, तर प्रशासनाने नवीन वाहिनी टाकण्याचा घाट कशाला घातला? नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी महापालिकेकडून सुरू आहे.
हे काम करण्यासाठी ठेकेदाराने जवळपास दोन महिन्यांपासून रस्ता खोदला आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याने त्याची वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रामनगर येथे लाख रुपये खर्चून सांडपाणी वाहिनीचे काम करण्यात आले आहे. जुनी वाहिनी काढून या ठिकाणी नवीन वाहिनी टाकणे गरजेचे होते. मात्र, जुन्या ड्रेनेजलाइनच्या शेजारी नवीन लाइन टाकली आहे. त्यातून सांडपाणी वाहून जात नसल्याने ते रस्त्यावर येत आहे. भविष्यात जुनी वाहिनी खचली, तर पुन्हा खोदाई करावी लागणार आहे. या कामात प्रशासनाचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत आहे.- पैगंबर शेख, रहिवासी, रामनगर
या कामाची पाहणी करण्यात आली आहे. जुन्या सांडपाणी वाहिनीवर घरांच्या पायर्या असल्याने ती काढणे अवघड आहे. त्यामुळे जुन्या वाहिनीचे पाणी पाइपद्वारे नव्या वाहिनीत सोडण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी चेंबर बांधल्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल.- अमर साठे, कनिष्ठ अभियंता, मलनिस्सारण देखभाल व दुरुस्ती विभाग, महापालिका