पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीने नव्यानेच वाघोलीत उभारलेला नवा ई-डेपो आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. येत्या दोन दिवसांत या डेपोतून 105 ई-गाड्या सुटणार असून, येथून दररोज प्रवास करणार्या सुमारे 40 हजार प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून वेळेत बस मिळत नसल्यामुळे वाघोलीकर नागरिक त्रस्त झाले होते. या भागातून धावणार्या गाड्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी अपुर्या पडत होत्या. त्यामुळे येथील नागरिकांनी पीएमपीला या भागातील गाड्या वाढविण्याची मागणी केली होती. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने येथे नव्याने उभारलेला ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत येथील
ई-डेपोतून अतिरिक्त बस सुटणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
असा आहे डेपो
वाघोली डेपोचे क्षेत्रफळ – सव्वा तीन एकर
डेपोत असलेल्या पूर्वीच्या
ई-गाड्या – 50
नव्याने वाढविण्यात
येणार बस – 55
पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाघोली डेपोतून सुटणार्या एकूण गाड्या – 105
वाघोली डेपोअंतर्गत दररोज प्रवास करणारे – 40 हजार
वाघोली डेपोचे दिवसाचे उत्पन्न – सुमारे 6 लाख रुपये
वाघोली येथील नागरिकांच्या सोयीसाठी येथील नवा ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही झाली असून, दोन दिवसांत या सव्वा तीन एकरच्या डेपोतून 105 ई-बस धावतील. त्यामुळे येथील नागरिकांना वेळेत गाड्या उपलब्ध होतील.
– दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी