पुणे: डेंग्यू विषाणूच्या डेनव्ही-2 या गंभीर प्रकाराचे अस्तित्व 65 ते 70 टक्के नमुन्यांमध्ये आढळल्याचे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. या प्रकारामुळे रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक मानली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याने त्वरित प्रतिबंधात्मक उपायांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे नॉलेज क्लस्टर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यूबाबतच्या अभ्यासासाठी सुरुवात 24 मार्च 2023 मध्ये झाली. एप्रिल 2023 पासून आत्तापर्यंत सुमारे 5,000 नमुन्यांची एलायझा आणि रॅपिड डायग्नोस्टिक पद्धतीने तपासणी करण्यात आली आहे. 2023 आणि 2024 मध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे या डेटातून स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, ‘तपासणीत डेंग्यू सिरोटाईप - 2 हा प्रकार सर्वाधिक आढळला आहे. ‘जिनोमिक्स लॅब’ने सुमारे 54 नमुन्यांवर संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग केले आहे. हा अभ्यास लसीचा विकास आणि स्वस्त निदान चाचणी तयार करण्यासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून देईल.
डीईएनव्ही-2, डीईएनव्ही -3 मुळे गंभीर आजार
डेंग्यू विषाणू चार प्रकारांचा असतो. यामध्ये डीईएनव्ही-1, डीईएनव्ही-2, डीईएनव्ही -3 आणि डीईएनव्ही -4 असे चार सिरोटाईप असतात. यापैकी कोणत्याही प्रकारामुळे संसर्ग होऊ शकतो. यामधील 2 व 3 सिरोटाईपमुळे गंभीर स्वरूपाचा आजार उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती हे सध्या काळाची गरज बनली आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.