पुणे

एनसीईआरटीकडून पुढील वर्षी नवी पुस्तके

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीईआरटी) पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय पुस्तके नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उपलब्ध होतील. ही पुस्तके थेट प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यांनी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यासाठी पावले उचलावीत, अशी माहिती 'एनसीईआरटी'चे संचालक डी. पी. सकलानी यांनी दिली.

पुण्यातील शैक्षणिक घडामोडीचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनी दिल्लीतील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. या वेळी 'एनसीईआरटी' संस्थेत झालेल्या भेटीदरम्यान सकलानी यांनी माहिती दिली. जूनच्या अखेरीस इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध होतील. या पुस्तकांचा वापर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासोबतच (सीबीएसई) इतर राज्य मंडळांना करता येणार आहे, असेही सकलानी यांनी सांगितले.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची देशात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी 'एनसीईआरटी'कडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी राज्य सरकारांशी बोलणी सुरू आहेत. पहिली ते बारावीसाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. या पुस्तकांचा राज्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत फायदा होण्यासाठी मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग यांचावापर करण्यात येत आहे. विविध राज्यांना त्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी फायदा होणार आहे, असे सकलानी म्हणाले

SCROLL FOR NEXT