ओतूर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील पहिले धरण सध्या उपयुक्तता व जलसंपदा या दोन्ही बाबतीत निरुपयोगी झाले आहे. धरणात 80 टक्के गाळ असून पाटबंधारे विभागाचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा नेतवड ग्रामस्थ करत आहेत. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही गाळ उपसा होत नाही. परिणामी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
पिंपळगावजोगा, चिल्हेवाडी धरण होण्याआधी याच धरणातील पाणी नेतवड, उदापूर, बल्लाळवाडी, माळवाडी, गणपती फाटा, डिंगोरे, मांदारणे, चौधरवाडी आदीं गावांना मिळत होते. सद्य:स्थितीत धरण पूर्णतः गाळाने भरून गेल्याने पाणीसाठा कमी आहे. काही दिवसात शेतीला पाणी मिळेल का या चिंतेने शेतक-यांना ग्रासले आहे. जुन्नर हा धरणांचा तालुका असे सांगितले जाते. मात्र, सर्वांनाच नेतवड धरणाचा विसर पडला आहे. एका बाजूला जुन्नर हा महाराष्ट्रातील 'पहिला पर्यटन तालुका' जाहीर झाला. दुसरीकडे स्वातंर्त्योत्तर काळातील विकासाच्या पाउलखुणांकडे दुर्लक्ष होत आहे.
इंग्लंडमध्ये नोंद, महाराष्ट्रात नाही
नेतवडपासून 2 किलोमीटरवर ठिकेकरवाडीनजीक 15 फूट उंच व 100 मीटर लांबीची भिंत असलेले हे धरण आहे. 1956 साली बांधलेले तालुक्यातील हे पहिले धरण आहे. धरणाला स्वयंचलित दरवाजा असून धरणाची नोंद इंग्लंडमध्ये आहे, परंतु महाराष्ट्रात कागदोपत्री कुठलीही नोंद नाही, अशी माहिती पुढे येत आहे. अनेक के. टी. बंधा-यांची नोंद आहे ,परंतु नेतवडच्या धरणाचा उल्लेखही नाही.