पुणे

नेरे-दत्तवाडीतील ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक; कुसगाव धरणात जलसमाधीचा तरुणांचा इशारा

Sanket Limkar

मारुंजी : कासारसाई (कुसगाव) धरणातून नेरे, दत्तवाडी गावासाठी असलेला आरक्षित पाणीसाठा मिळावा आणि शासनाची मंजूर नेरे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी, यासाठी नेरे-दत्तवाडी ग्रामस्थ एकवटले आहेत. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी नेरे ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन एकमुखी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच, पाणी मिळाले नाही, तर आम्ही कुसगाव धरणात जाऊन जलसमाधी घेऊ, असा इशारा नेरे, दत्तवाडीतील तरुणांनी दिला आहे.

धरणात पाणी तरीही पाणीटंचाई

दत्तवाडी येथील दत्त मंदिरात ग्रामसभेचे आयोजन केले होते. या वेळी नेरे दत्तवाडी कृती समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सरपंच सचिन जाधव, माजी सदस्य भास्कर जाधव यांसह दोनशे ते अडीचशे ग्रामस्थ उपस्थित होते. जलजीवन मिशनअंतर्गत नेरे पाणीपुरवठा योजनेकरिता कासारसाई (कुसगाव) प्रकल्पातून 1.1952 दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. त्यामध्ये नेरे येथे 5.00 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, 9 लाख लिटर (दत्तवाडी) व 6.18 लाख लिटर (खाण) उंच टाकी बांधणे नियोजित आहे. या कामासाठी निधीदेखील मंजूर झालेला आहे.

धरण क्षेत्रात नियमित पाऊस पडत असल्याने दरवर्षी येथील कुसगाव धरण 100 टक्के भरत असते. पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठी आरक्षित पाणीसाठा देऊनही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहत आहे. त्यातच धरणग्रस्तांच्या पुनर्वसनसाठी नेरे ग्रामस्थांनी सुमारे 300 हून अधिक एकर जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे नेरेकरांचे हक्काचे आरक्षित पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत.

सुरुवातीला गावातील काही नागरिकांनी योजनेमधील कागदोपत्री त्रुटी काढून विरोध केला होता. मात्र, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून ग्रामस्थांनी एकत्र यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. कासारसाई येथील काही ग्रामस्थांकडून नेरेला पाणी देण्यासाठी विरोध केला जात आहे. यावर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालीच तर शेती आणि औद्योगिक यासाठी लागणारे पाणी बंद करून पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने नेरे गावच्या पिण्याच्या पाण्याचा मंजूर आरक्षित साठा कोणीही अडवू शकत नाही. ही योजना पूर्ण झाल्यास पुढील 30 वर्षे गावाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नेरे येथील आरक्षित साठा देऊनही धरणात अधिकचा साठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे यासाठी कोणीही विरोध करू नये, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT