पुणे

राजगुरूनगर : टेपरेकॉर्डचा आवाज कमी कर म्हणणाऱ्या चुलता चुलतीवर पुतण्याचा खुनी हल्ला

अमृता चौगुले

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: गाडीतील टेपरेकॉर्डचा आवाज मोठा असल्याच्या कारणावरून चुलता-चुलतीवर पुतण्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना कराळे वस्ती, जउळके खुर्द, (ता खेड) येथे रविवारी (दि १३) दुपारी तीन च्या सुमारास घडली. लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याने चुलता-चुलती गंभीर जखमी झाले असून चुलती अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कराळे वस्ती, जवळके बुद्रुक येथे रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या पुतण्याने घराजवळ उभी असलेल्या इको ( एमएच १४ जी एम २१७४ ) या गाडीतील टेप लावून त्याचा आवाज वाढवला होता. आवाज कमी कर असे सांगण्यासाठी एकनाथ गेनभाऊ कराळे(वय 46) हे गेले असता पुतण्या वैभव पंढरीनाथ कराळे यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात आणि नंतर हाणामारीत झाले. तु मला कोण सांगणार? तु का माझा बाप आहे का? तुला आता खल्लास करून टाकतो? अशी शिवीगाळ दमदाटी करून गाडीत असलेला लोखंडी रॉड घेऊन वैभव कराळे खाली उतरला. त्यावेळी तेथे वैभवचे वडील पंढरीनाथ गेणभाऊ कराळे हे होते. या दोघांमध्ये हाणामारी झाली. एकनाथ कराळे यांच्या पत्नी हाणामारी सोडविण्यासाठी मध्ये आल्या असता त्यांनाही गजाने मारहाण करण्यात आली. यात फिर्यादी व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. पुतण्या वैभव पंढरीनाथ कराळे व भाऊ पंढरीनाथ गेनभाऊ कराळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बाप लेकांची नावे आहेत.

या घटनेत वैभव कराळे याने चुलता-चुलतीला डोक्यात, तोंडावर व डोळ्यावर गजाने मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. जखमी एकनाथ गेनभाऊ कराळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खेड पोलिसांनी पंढरीनाथ व वैभव कराळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT