पुणे

Nepal-Tibet Floods : तिबेटमध्ये पुण्याचे चार यात्रेकरू संकटात; दोन महिलांची प्रकृती चिंताजनक, हवाई मदतीची याचना

भारतात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे यात्रेकरूंसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कैलास-मानसरोवर यात्रेसाठी चीनमधील तिबेट येथे गेलेले पुण्यातील चार भारतीय यात्रेकरू जिलोन्ग (केरुंग) शहरात अडकले आहेत. नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालय अचानक आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याने भारतात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे यात्रेकरूंसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये स्मिता पवार, योगिनी पाटील, पूजा भोसले आणि दिनेश भोसले यांचा समावेश आहे. त्यापैकी स्मिता पवार आणि योगिनी पाटील यांना मानसरोवर परिसरातील अधिक उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवली. दोघींना हायपॉक्सियाचा गंभीर त्रास झाल्यानंतर सतत ऑक्सिजनचा पुरवठा करीत जिलोन्ग येथे खाली आणण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना तातडीने पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे.

जिलोन्ग परिसरातील वैद्यकीय सुविधा मर्यादित असल्याने या दोन्ही महिलांना काठमांडू येथे हलविणे आवश्यक असल्याचे यात्रेकरूंनी सांगितले. मात्र, पुरामुळे नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, सीमा ओलांडण्याचा मार्ग सध्या उपलब्ध नाही. स्थानिक परिस्थितीही सुरक्षित नसल्याने रस्ते मार्गाने स्थलांतर करणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर चीनच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने चारही यात्रेकरूंना जिलोन्ग येथून थेट काठमांडूला हेलिकॉप्टर किंवा अन्य हवाई मार्गाने हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय यंत्रणांनी चीनमधील अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून वैद्यकीय हवाई स्थलांतराची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हा गट कैलास-मानसरोवर ग्रुप व्हिसावर चीनमध्ये दाखल झाला असून, व्हिसाची मुदत ९ सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या हे यात्रेकरू जिलोन्ग येथील हॉटेल जियांगडाकांग येथे वास्तव्यास आहेत.

“सीमा मार्ग बंद असल्याने आमच्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही महिलांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यांचा जीव वाचविण्यासाठी भारतीय यंत्रणांनी त्वरित हस्तक्षेप करावा,” अशी मागणी दिनेश भोसले यांनी केली.

संपर्क : +९१ ७४४७४८३३४०, +९१ ९१७५५६६६६३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT