NEET UG 2026 Retest Pudhari
पुणे

NEET UG 2026 Retest: कडेकोट बंदोबस्तात नीट-यूजी 2026 पुनर्परीक्षा; पुण्यात परीक्षा सुरळीत

भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पेपर अवघड, जीवशास्त्र तुलनेने सोपा; पुण्यात २७ केंद्रांवर यशस्वी आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) रविवारी (दि. २१) कडेकोट बंदोबस्तात पार पडली. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मदतनिसाची भूमिका अत्यंत संयमाने व जबाबदारीने पार पाडली. त्यामुळे पुण्यासह राज्यात परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे स्पष्ट झाले.

भारतातील ५ हजार ४४० आणि परदेशातील १४ केंद्रांवर नीट २०२६ ची पुनर्परीक्षा २० लाखांहून अधिक उमेदवारांनी दिली. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह एकूण १३ भाषांमध्ये घेण्यात आली. १० हजारांहून अधिक दिव्यांग उमेदवारांसह सर्वच उमेदवारांसाठी व्यापक व्यवस्था केली होती. वैद्यकीय समस्या असलेल्या ८१ उमेदवारांसाठी विशेष सोय करण्यात आली होती. यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेला एक विद्यार्थी आणि केमोथेरपी घेत असलेला एक विद्यार्थी यांचा समावेश होता.

परीक्षा केंद्रांवर आधार-आधारित बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळखण्याची प्रणाली), सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात आली. पेपरफुटीच्या घटनांमुळे नीट परीक्षा देशभर चर्चेत आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि तणावरहित वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी पुणे शहर व जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर २० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यात एकूण ३६, तर पुणे शहरात २७ परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्रांबाहेरील वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन पोलिसांनी प्रभावीपणे हाताळले. मागील काही स्पर्धा परीक्षांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना समोर आल्याने यंदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच, विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रावरील अधिकृत कर्मचारी वगळता इतर कोणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नव्हता.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अवघड; तर जीवशास्त्राचा पेपर सोपा

रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत नीट पुनर्परीक्षा पार पडली. सकाळी ११ ते दुपारी १.३० या कालावधीतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्रातून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर काहीसा अवघड, तर जीवशास्त्राचा पेपर काहीसा सोप्पा असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT