पुणे: वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणार्या उमेदवारांसाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस अर्थात एनबीईएमएसने पदव्युत्तर पदवीसाठी राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा नीट पीजी 2025 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 15 जून 2025 (रविवार) रोजी घेतली जाईल. नीट पीजी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने दोन सत्रांत घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नीट पीजी परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी अर्ज करतात. एनबीईएमएस लवकरच परीक्षेबाबत अधिकृत माहितीचे बुलेटिन प्रसिद्ध करेल, ज्यामध्ये नोंदणीची तारीख, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचा नमुना यांसारख्या तपशिलांचा समावेश असेल. नीट पीजी 2025 चा अभ्यासक्रम मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात एमसीआयअंतर्गत निश्चित केलेल्या पदवीधर वैद्यकीय शिक्षण नियमांवर आधारित असेल.
यामध्ये शरीरशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान, जैवरसायनशास्त्र, पॅथॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषध, शस्त्रक्रिया, स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, त्वचाविज्ञान, रेडिओलॉजी आणि ऑर्थोपेडिक्स यांसारख्या विषयांचा समावेश असेल.