NEET Paper Leak Case | ‘नीट’ पेपरफुटीचे मास्टरमाईंड अद्याप मोकाटच!  
पुणे

NEET Paper Leak Case | ‘नीट’ पेपरफुटीचे मास्टरमाईंड अद्याप मोकाटच!

मनीषा मांढरे, मनीषा हवालदारांसह अटक झालेले लोक केवळ प्यादे; येत्या काळात मोठे मासे लागणार गळाला

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे : नीटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार हे केवळ प्यादे असून, नीट पेपरफुटीच्या रॅकेटचे मास्टरमाईंड अर्थात प्रमुख सूत्रधार हे अद्याप मोकाटच आहेत. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या शिक्षकांच्या सखोल चौकशीतूनच आता इतर अन्य शिक्षकांच्या समावेशाची माहिती मिळणार असून, यातून आणखी मोठे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नीट प्रश्नपत्रिका तयार करणारे विषयतज्ज्ञ हे शहरातील काही महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करत असले तरी खासगी शिकवण्यांमध्ये देखील अध्यापनाचे काम करतात किंवा स्वत: खासगी क्लासेस चालवतात. यातूनच नीटचे प्रश्न बाहेर फुटले आहेत. यामध्ये एनटीएच्या देखील अधिकार्‍यांचे साटेलोटे असून, येत्या काळात एनटीएचे एक्सपर्ट तसेच अधिकार्‍यांची चौकशी होईल आणि त्यातून आणखी मोठे मासे गळाला लागणार असून, त्यांच्यावरदेखील कारवाईची टांगती तलवार आहे.

एनटीएच्या एका माजी विषयतज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणार्‍या विविध नामांकित महाविद्यालयांमधील शिक्षकांचा एक मोठा गट पुण्यात कार्यरत आहे. यामध्ये साधारण 20 ते 25 शिक्षकांचा समावेश आहे. यातील काही शिक्षक निवृत्त झाले आहेत; तर काही अद्यापही सेवेत आहेत. परंतु, 2013 पासून तेच तेच शिक्षक विषयतज्ज्ञ म्हणून काम पाहत आहेत. संबंधित विषयतज्ज्ञ रजेच्या अर्जावर एनटीए कार्यालयात जाण्यासाठी रजा हवी असे सांगायचे. त्यामुळे हे लोक वारंवार एनटीएच्या कार्यालयात नेमके कशासाठी जातात, असा प्रश्न देखील पडायचा; परंतु नीट पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचे हे गुपित आता उघड झाले आहे. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील एनटीएशी संबंधित विषयतज्ज्ञ आणि त्यांच्या सहकार्‍यांची देखील सखोल चौकशी करून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्‍यांचे हे रॅकेट कायमचे उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे.

संस्थांनी ही कीड दूर करावी

नीटपेपर प्रकरणी एखादा कर्मचारी दोषी असला म्हणून संस्थेला दोषी ठरविणे चुकीचे असल्याची वल्गना संस्थांकडून केली जाते. परंतु, संस्थांना बदनाम करणारे शिक्षक शोधून त्यांची चौकशी संस्थास्तरावरच करून अशा प्रकारची कीड संस्थांनीच दूर करणे गरजेचे आहे. एखाद्या गैरकृत्यात ज्यावेळी एखादा शिक्षक अडकतो. त्यावेळी तो शिकवत असलेल्या संस्थेतील अन्य शिक्षक देखील त्या कार्यात सहभागी असण्याची शक्यता असते. त्यामुळे संस्थांच्या मुळावर उठणार्‍या शिक्षकांचा संस्थांनीच बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचेही संबंधित विषयतज्ज्ञाने स्पष्ट केले.

विषयतज्ज्ञांच्या चौकशीची गरज...

नीटपेपर फुटीप्रकरणी पुणे हे मुख्य केंद्र बनले आहे. नीट प्रश्नपत्रिका तयार करण्यात विशेष करून विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांसह अन्य काही विषयतज्ज्ञांची आवश्यकता असते, तर अनुवादक म्हणून काही वाणिज्य शाखेचे शिक्षकदेखील यामध्ये कार्यरत असतात. त्यामुळे पेपरफुटीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील नीट पेपरची प्रश्नपत्रिका सेट करण्यात मोलाची भूमिका राहिलेल्या शिक्षकांची कसून चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत शहरातील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्तकेले आहे.

नीट परीक्षा कधी सुरू झाली?

2013 मध्ये पहिल्यांदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने नीट परीक्षा घेतली

2014 आणि 2015 मध्ये काही कायदेशीर वाद व राज्यांच्या विरोधामुळे परीक्षा होऊ शकली नाही

2016 मध्ये नीट परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आली आणि ती सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आली

2019 मध्ये ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ची स्थापना. परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीकडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT