चाकण (पुणे), पुढारी वृत्तसेवा: चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचार्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीत. चाकण येथे महत्त्वाच्या तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. चाकणमधून बाह्यवळण मार्ग तातडीने करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवजड वाहतूक शहराबाहेरून गेल्यास वाहतुकीच्या कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल, अशी नागरिकांची भावना आहे. बाह्यवळण मार्गासाठी पाहणी होत असली, तरी अद्याप चालना मिळालेली नाही. चाकण परिसरात रहदारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या भागातील राष्ट्रीय महामार्ग पादचार्यांसाठी असुरक्षित ठरत आहेत. वाहनांची प्रचंड संख्या, वाहतूक नियमांकडे सर्रास केले जाणारे दुर्लक्ष, झेब—ा क्रॉसिंगची वानवा, अस्तित्वातच न आलेले फूटपाथ, पादचार्यांसाठी नसणारे सिग्नल यामुळे चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचार्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीत. कंपन्यांत कामगार जाण्याच्या आणि सुटण्याची वेळी वाहनांपेक्षाही येथे पायी चालणार्यांची संख्या मोठी असते; मात्र याच पादचार्यांना जीव मुठीत धरून महामार्ग आणि चौक ओलांडावे लागतात. त्यामुळे चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीने करण्याची मागणी होत आहे.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीमुळे आणि वाढत्या अपघातांमध्ये वाहन चालक, पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेकदा निरपराध पादचारी रस्त्यावर अपघातग्रस्त होत आहेत. भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेला पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडतो; तर मुंबई, अहमदनगर आणि औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणार्या वडगाव मावळ ते शिक्रापूर दरम्यानचा महामार्ग आहे. मात्र, येथील रस्त्यांचे लालफितीत अडकलेले काम आणि वाहतूक नियमन करताना येणार्या अडचणी यामुळे येथील महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहेत.