पुणे

अंजिर फळांवर प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज ; खा. शरद पवार यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

बेलसर : पुढारी वृत्तसेवा :  अंजिराची नुसती शेती करून चालणार नाही. प्रक्रिया उद्योगाची उभारणीही गरजेची आहे. पुरंदरचे अंजीर देशाच्या कानाकोपर्‍यात तसेच बाहेर देशात जात आहे. अंजिरावर आता प्रक्रिया होऊन ज्यूस बाजारात येत आहे. या भागात पुरंदर उपसा सिंचन पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे हे सर्व चित्र बदलले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
सिंगापूर (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शंकरराव उरसळ त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शरद पवार यांच्या हस्ते पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने तयार केलेल्या अंजीर ज्यूसचे अनावरण करण्यात आले.

शरद पवार म्हणाले की, शंकरराव उरसळ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर पुरंदर तालुक्याचे चित्र बदलण्याचे काम केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया भक्कम केला. आज लाखभर विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. पूर्वी शेतीला मर्यादा होत्या. आता यात बदल झाला आहे. शेती सुधारण्याची संधी आली आहे. नुसते अंजीर लावून चालणार नाही, तर त्यावर प्रक्रिया देखील झाली पाहिजे.

या वेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सतीशशेठ उसळ, पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष रोहन उरसळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित निगडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरव्यवस्थापक राहुल येळे, सरपंच संगीता वारे, उपसरपंच सौरभ लवांडे, अतुल कडलक, मीना उरसळ, ग्रामसेविका शीतल आटोळे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT