पुणे

पुणे : नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक ; लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्राची सुरक्षा कोणाकडेही सोपविता येत नाही. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन व विकासावर भर देऊन आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. संशोधनामध्ये गुंतवणूक करून आपल्या क्षमता वाढविणे आश्यक आहे. 'आत्मनिर्भर भारत'मुळे देशात संशोधन व विकासाला चालना मिळत असून, लष्करातही त्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले. दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) 29 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अर्चना मनोज पांडे, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे मेजर जनरल टी. एस. बैनस, मेजर जनरल आर. के. रैना, एआयटीचे संचालक बि—गेडिअर अभय भट उपस्थित होते. या वेळी उद्योजक बाबा कल्याणी यांना 'एआयटी'ने 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मानित केले.

पांडे म्हणाले, 'एआयटी'ने गेल्या 25 वर्षांमध्ये संरक्षण दलाला उत्तम अधिकारी दिले आहेत. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक आहेत. त्याबरोबरच 'उड चलो'सारखे स्टार्टअप सुरू केले आहेत.' कल्याणी म्हणाले, 'हा पुरस्कार मला मिळाल्याने मी संस्थेचा आभारी आहे. मेक इन इंडिया आणि सशक्त भारत सारख्या योजनांची अंमलबजावणी 25 वर्षे उशिराने होत आहे. भारत हा अनेक वर्षे शस्त्रास्त्रे आयात करीत होता. परंतु, पंतप्रधानांच्या पुढाकाराने भारत आता शस्त्रे निर्यातदार बनत आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहे. उद्योगांना पोषक पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. जगाच्या तुलनेत महागाई आपण मर्यादित ठेवली आहे. 'भारत प्रथम'अंतर्गत जगातील देश भारताकडे आशेने पाहत आहेत.'

SCROLL FOR NEXT